घरमुंबईटेंपोच्या धडकेत शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

टेंपोच्या धडकेत शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Subscribe

पोलिसांविरोधात नागरिकांमध्ये संताप

भिवंडी तालुक्यातील वसई -पारोळ रोडवरील खेमीसती कापड डाईंगसमोर एका भरधाव बोलेरो पिकअप टेंपो गाडीने रविवारी दुपारी 11ः30 वाजता शाळा सुटल्यानंतर रस्त्यावरून पायी घरी चालत जाणार्‍या एका शालेय विद्यार्थ्याला जोरदार ठोकर दिली. या अपघातात शालेय विद्यार्थीचा जखमी अवस्थेत जागीच मृत्यू झाला आहे. या मार्गावर बेकायदा पार्किंग होत असल्याने आणि या थांबलेल्या वाहनांना ओव्हरटेक करून भरधाव ये-जा करणार्‍या वाहनांमुळे हे अपघात होत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली आहे.

मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी व अपघात होत असते. अशी संतप्त प्रतिक्रिया नागरीकांकडून व्यक्त करण्यात येत होती. अकित केशरीलाल गुप्ता (13.रा. मीठपाडा, शेलार भिवंडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नदीनाका येथील जीवन ज्योती हिंदी हायस्कुलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. या अपघात प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात टेंपो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून चालक राजेश प्रजापती यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अंकित शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी अन्य विद्यार्थ्यांसोबत रस्त्याने पायी निघाला होता. त्यावेळी खेमीसती डाईंगसमोर पाण्याचे टँकर उभे होते. त्यामुळे समोरून कापडाचे तागे भरलेला टेंपो ओव्हरटेक करून येत असताना त्याची धडक अंकितला लागून त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

भिवंडी-पारोळ रोडवरील नदीनाका येथील केमीसती प्रोसेस या कंपनीच्या रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे टँकर मोठ्या संख्येने थांबलेले असतात. त्यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या मार्गावर पुढे असणार्‍या शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने हा रस्ता भिवंडी-वाडा महामार्गास जोडला जातो. त्यामुळे नेहमीच जड, अवजड वाहने या मार्गावर ये-जा करत असतात. वाहतूक पोलिसांचा येथे कायम बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शांताराम भोईर यांनी पोलीस व तहसीलदारांकडे अनेक वेळा केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी व अपघात होत असतात अशी संतप्त प्रतिक्रिया भोईर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -