घरमुंबईबेस्ट बसची धडक लागून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

बेस्ट बसची धडक लागून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

Subscribe

अंधेरीतील अपघात; चालकास अटक व सुटका

बेस्ट बसची धडक लागून एका 81 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी अंधेरी परिसरात घडली. कांचनबेन सौजीभाई मिस्त्री असे या वयोवृद्ध महिलेचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी बेस्ट चालक बबन विठ्ठल थोरात याला अंधेरी पोलिसांनी अटक केली. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकूंद पवार यांनी सांगितले. हा अपघात शनिवारी अकरा वाजता अंधेरीतील गणपती मंदिरासमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कांचनबेन ही वयोवृद्ध महिला अंधेरीतील एस. एम. मार्गावरील संगीना मेन्शन इमारतीमध्ये राहते. त्या नेहमी सकाळी नऊ वाजता घरापासून काही अंतरावर असलेल्या गणपती मंदिरात पूजेसाठी येत होत्या. शनिवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आल्या होत्या. पूजा संपल्यानंतर सकाळी अकरा वाजता त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. यावेळी तेथून जाणार्‍या एका बेस्ट बसची धडक लागून त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

- Advertisement -

जखमी झालेल्या कांचनबेन यांना तातडीने पोलिसांनी कूपर रुग्णालयात दाखल केले होते, मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी कांचनबेन मिस्त्री यांचा मुलगा मुकेश मिस्त्री याच्या तक्रारीवरुन अंधेरी पोलिसांनी बेस्ट बसचालक बबन थोरात याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. मात्र पोलीस ठाण्यातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. ही बस आगरकर चौकातून विहार लेकच्या दिशेने जात होती. आगरकर चौकातून ही बस गणपती मंदिराजवळ येताच हा अपघात झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकूंद पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -