घरमुंबईदरबार हॉल शपथविधीला महायुतीचे मंत्रीमुकणार

दरबार हॉल शपथविधीला महायुतीचे मंत्रीमुकणार

Subscribe

दोन वर्षे लागणार नव्या बांधकामाला

आघाडी सरकारच्या काळात बहुतांश शपथविधी सोहळ्यांचा साक्षीदार असलेला राजभवनातील दरबार हॉल सध्या दुरूस्तीसाठी जमीनदोस्त करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी शपथविधी सोहळ्यांसाठी दरबार हॉल उपलब्धच होणार नाही. सलग तिसर्‍यांदा महायुतीचे मंत्री दरबार हॉलमधील शपथविधीला मुकणार आहेत. नव्या रुपात आणि वैशिष्टपूर्ण बांधणीत तयार व्हायला दरबार हॉलला दोन वर्षे लागणार आहेत.

याआधी शिवतीर्थावर १९९५ मध्ये युती सरकारचा शपथविधी झाला होता. तर २०१४ साली वानखेडे स्टेडियम येथे नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. तर सरकारचा विस्तारीत शपथविधी सोहळा राजभवनच्या हेलिपॅडवर काही महिन्यांपूर्वीच पार पडला होता. याआधी आघाडी सरकारच्या काळातील शपथविधी सोहळे मात्र राजभवनात दरबार हॉलमध्येच झाले होते. पण युती सरकारच्या काळात दोन्ही वेळा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोहळ्याला उपस्थित राहता यावे म्हणून दरबार हॉल व्यतिरिक्त अन्यत्र शपथविधी सोहळे झाले आहेत.

- Advertisement -

असे आहे दरबार हॉलच नवे रूप
गेल्या काही महिन्यांपासून दरबार हॉल तसेच राज्यपालांचे निवास स्थान ही वास्तू संपूर्णपणे जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. अनेक भागात ही वास्तू कमकुवत झाली होती. तसेच तिचा काही भाग जीर्ण झाल्यानेच जुनी वास्तू तोडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नव्या दरबार हॉलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आसनक्षमतेत वाढ करण्यात येणार आहे. साधारणपणे ८०० लोकांच्या क्षमतेचा नवीन दरबार हॉल असणार आहे. मुळचे दरबार हॉलचे बांधकाम हे १९११ साली करण्यात आले होते. पण त्यानंतरही अनेकदा या दरबार हॉलची डागडुजी करण्यात आली आहे. दरबार हॉलप्रमाणेच राज्यपालांचे निवासस्थानही नव्याने बांधण्यात येणार आहे.

दरबार हॉलचा हेरीटेज अ‍ॅम्बियन्स तसाच रहावा म्हणून आभा लांबा या प्रसिद्ध वास्तुविशारद संपूर्ण हॉलची नवीन रचना करणार आहेत. तर राज्यपालांच्या निवासाची रचना ही चेतन गायकर हे सुप्रसिद्ध वास्तुविशारद करणार आहेत. चेतन गायकर यांनी या आधी हाजीअलीच्या डिझाईनचे काम केले आहे. हेरीटेज वास्तू म्हणून राजभवनचा लुक कायम कायम ठेवण्यात येणार आहे. नवी वास्तू भूकंपरोधक असेल. तसेच मुंबईतील दमट वातावरणाचा या वास्तुवर परिणाम होणार नाही, याची काळजी देखील घेण्यात येणार आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -