घरमुंबईअकरावीची मार्गदर्शन केंद्रे कुचकामी

अकरावीची मार्गदर्शन केंद्रे कुचकामी

Subscribe

मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विविध महापालिका क्षेत्रात मार्गदर्शन केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नसल्याने अखेर पालकांना उपसंचालक कार्यालय गाठावे लागत आहे. शहरापासून खूप दूरवर उपसंचालक कार्यालयाने मार्गदर्शन केंद्रे सुरू केली असून येथील अधिकारीही फोन घेत नसल्याने पालक हैराण झाले असून ही केंद्रे कुचकामी ठरत आहेत.

अकरावी ऑनलाईन प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रत्येक महापालिका हद्दीत मार्गदर्शन केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रावर पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान होणे अपेक्षित असताना पालकांना तासन्तास येथे थांबावे लागत आहे. विविध केंद्रांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत समाधान होत नसल्याने ते चर्नी रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल होत आहेत. येथे पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निरसण करण्यात येत आहे.

- Advertisement -

कल्याणमधील मुथा कनिष्ठ महाविद्यालयात सुरू करण्यात आलेले मार्गदर्शन केंद्र शहरापासून आठ ते नऊ किलोमीटर लांब असल्याने तिथे पालकांना पोहचण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माहिती पुस्तिकेमध्ये शिक्षण उपसंचालकांनी अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. परंतु हे क्रमांकही अधिकारी बंद ठेवत असल्याने पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करून महाविद्यालयापर्यंत पोहचावे लागत आहे. अधिकार्‍यांकडून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेची कामे प्रलंबित ठेवण्यात येत असल्याने तेथे तांत्रिक अडचणी घेऊन जाणार्‍या पालकांना तासन्तास येथे थांबावे लागत आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे पालक रंजित माजगावकर यांनी माहिती केंद्रातील अधिकार्‍यांना शेकडो फोन केले. परंतु दोन अधिकार्‍यांचे फोन बंद तर एकाने संबंधित फोनला एकही रिप्लाय दिला नाही. यामुळे संतप्त झालेल्या माजगावकर यांनी थेट शिक्षण उपसंचालक कार्यालय गाठत आपली व्यथा मांडली. अखेर येथील अधिकार्‍यांनी प्रवेश अर्जातील त्यांची त्रुटी दूर केली. याबाबत शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -