Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर महामुंबई भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न

भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या गौप्यस्फोट

Mumbai
Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात

राज्यात सुरु असलेला सत्ता स्थापनेचा घोळ अद्याप कायम असताना गुरुवारी विरोधकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला. भाजपकडून निवडणुकीच्या अगोदर सुरु केलेले फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा एकदा सुरुवात केल्याचा दावा विरोधकांनी केला. दरम्यान भाजपाने आमच्या अनेक आमदारांशी संपर्क सुरू केलेला आहे, साम, दाम दंड, भेद वापरून निवडणुकीआधीपासून हे सुरू केले होते ते आता पुन्हा सुरु केले असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत केला.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असताना देखील गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेला सत्ता स्थापनेचा घोळ अद्याप संपलेला नाही. या संदर्भात मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील गौप्यस्फोट केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत टीकास्त्र सोडले. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असेलल्या राजकीय नात्याबद्दल ते म्हणाले की, आम्हाला वाटले की ते राज्यपालांना भेटणार आणि सरकार स्थापन करणार मात्र आज ही ते झाले नाही. ते रोज सांगतात की, त्यांची गोड बातमी येणार नेमकी ही गोड बातमी येणार तरी कधी? आम्ही गोड बातमीची वाट पाहतोय, इतकी गोड बातमी देणार म्हणाहेत तर भाजपने मॅटर्निटी होम उघडलंय का? रोज गोड बातमी देणार म्हणतात, अशा शब्दात त्यांनी भाजपचे तोंडसुख घेतले.

ते पुढे म्हणाले की,राज्यात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्या सगळ्या परिस्थितीला भाजप जबाबदार आहे. महायुती म्हणत ते निवडणुकीला सामोरे गेले; पण मित्रपक्षांना सांभाळले नाही. या सगळ्याला भाजप जबाबदार आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळत नाही. सत्ता स्थापनेचा हा दोघांचा प्रश्न आहे पण त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत आहे. राष्ट्रपती राजवटीची धमकी सुरुवातीपासून दिली जात आहे, हा धाक कुणाला दाखवला जातोय, असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
काँग्रेसचा एक गट दिल्लीला

राज्यात एकीकडे सत्ता स्थापनचा मुहूर्त अद्याप निघाला नसला तरी शिवसेनेला पाठिंबा द्यावा यावरून काँग्रेसमधील एक गट अद्याप प्रयत्नशील असल्याचे कळते. यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांचा एक गट गुरुवारी दिल्लीला गेला असल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी या गटाकडून काँग्रेस हायकमांडची भेट घेण्यात आली असून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत मत मांडल्याचे समोर येत आहे.

शरद पवार मुंबईत
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागांचा दौरा करण्यासाठी कालपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दौर्‍यावर निघाले होते. मात्र गुरुवारी हा दौरा अर्धवट सोडून शरद पवार मुंबईकडे निघाल्याचे कळते.

ही तर शेतकर्‍यांची अहवेलना – विजय वड्डेटीवर
काँग्रेसचा आमदारांना देखील भाजपकडून प्रलोभन दाखवण्यात येत आहे. आज शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र सरकार स्थापन करून शेतकर्‍यांची अहवेलना करीत आहे. आमचे आमदार सुरक्षित आहेत. ते ठाम आहेत. राज्यातील जनता आता हे फोडाफोडीचे राजकारण सहन करणार नाही, असे मत विजय वड्डेटीवर यांनी व्यक्त केले.

हा सगळा पोरखेळ – धनंजय मुंडे
महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल आज जनतेने बहुमत दिले असतानादेखील या लोकांनी हा सगळा पोरखेळ चालविला आहे. बहुमत मिळाल्यानंतरही फार मोठे पाप युतीने केले असल्याची टीका गुरुवारी धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. तर राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदारांना फोडण्याचा सध्या तरी प्रयत्न झालेला नाही. मात्र तसा प्रयत्न जर भाजपने केला तर त्याला जशाचा तसे उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिला.