घरमुंबईदरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

Subscribe

आरोपींना सहा लाखांच्या मुद्देमालासह अटक

नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. भाईंदर येथील इंद्रलोक ते कनकीया रोड लगत असलेल्या शिववंदना इमारतीतील धनलक्ष्मी ज्वेलर्सवर काही जण दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याचे व.पो.नि.राम भालसिंग यांनी आपल्या सहकार्‍यांंसह सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 39 हजार 800 रुपये किमतीचे 54 मोबाईल, तीन लाख किमतीचे सहा लॅपटॉप असा एकूण 6 लाख 39 हजार 800 किमतीचा माल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती 16 मार्च रोजी ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी दिली.

मोहम्मद युसूफ शेख, राजन गुप्ता, टिप्पू शेख, मुख्तार अहमद हे गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा, तीन राऊंड, लोखंडी सुरा, स्क्रू ड्रायव्हर आदी सामानांसह 14 मार्च रोजी ठाकरे मैदान इंद्रलोक भाईंदर पूर्व या ठिकाणी मोटारसायकलवर बसून दरोडा टाकण्याची तयारी करीत असतानाच त्यांच्यावर पोलिसांनी छापा टाकला. आरोपी त्या ठिकाणाहून पळून जात असतानाच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. त्यांच्यातील एक आरोपी छोटू हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे आरोपी गॅस कटरचा वापर करून बंद दुकानांचे शटर व ग्रील कापून आत प्रवेश करीत असत. दुकानातील मोबाईल ज्वेलरी चोरी केली असल्याची कबुलीही या आरोपींनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -