कॉलगर्ल म्हणून शिवीगाळ करुन तरुणीला मारहाण

अंधेरीतील घटना; 75 वर्षांच्या वयोवृद्धाला अटक

Mumbai
प्रातिनिधिक फोटो

भाडेकरु म्हणून राहणार्‍या एका 20 वर्षांच्या तरुणीला कॉलगर्ल म्हणून शिवीगाळ करुन मारहाण झाल्याची घटना अंधेरी येथे घडली. याप्रकरणी मारहाणीसह विनयभंग, धमकी दिल्याच्या गुन्ह्यात 75 वर्षांच्या एका वयोवृद्धाला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. शामलाल अमरनाथ गांधी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

20 वर्षांची ही तरुणी अंधेरीतील ओल्ड म्हाडा परिसरात राहत असून ती राहत असलेली खोली शामलाल गांधी यांच्या मालकीची आहे. तिच्यासोबत तिथे इतर आठ ते दहा तरुणी भाडेतत्त्वावर राहतात. ही तरुणी एमबीएचे शिक्षण घेत असून फिल्म इंडस्ट्रिजमध्ये अ‍ॅक्टिंग करते. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ही तरुणी घरातच एकटीच होती. यावेळी तिथे शामलाल आला. त्याने तिला पाहून धक्का देऊन रुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिला कॉलगर्ल बोलून तिच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिला वरच्या मजल्यावर बोलाविले.

अश्लील वर्तनाचा प्रयत्न
त्या तरुणीने याबाबत त्याला जाब विचारल्यानंतर त्याने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिचे काही पुरुषांशी संबंध असून तिने त्याच्यासोबतही संबंध ठेवावे असे बोलून तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तिने कंट्रोल रुमला कॉल करुन हा प्रकार सांगितला. ही माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या तरुणीची जबानी नोंदवून घेतल्यानंतर शामलाल गांधीविरुद्ध पोलिसांनी मारहाण करणे, धमकी देणे आणि अश्लील संभाषण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.