उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलिसांचा गौरव

Mumbai
इंडियन मर्चंट चेंबरतर्फे पोलिसांचा सन्मान

उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी करणार्‍या मुंबई पोलीस दलातील ७ अधिकार्‍यांना इंडियन मर्चंट्स चेंबर्स या संस्थेच्या वतीने पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. चर्चगेटजवळच्या वालचंद हिराचंद हॉलमध्ये हा सन्मान सोहळा पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्या उपस्थितीत पार पडला.

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सतर्क असणार्‍या पोलिसांना सलाम म्हणून धाडसी कामगिरी करणार्‍या पोलिसांचा गौरव करण्यासाठी इंडियन मर्चंट्स चेंबर ही संस्था दरवर्षी कार्यक्रम आयोजित करते. यंदा आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांच्या ७ अधिकार्‍यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये वाहतूक विभाग, गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांचा समावेश होता. गुन्हे शाखेच्या युनिट २ मध्ये काम करणारे पोलीस निरीक्षक अर्जुन जगदाळे यांंना अति उत्कृष्ट गुन्हा उघडकीस आणल्याप्रकरणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्याचबरोबर पायधुनी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणारे प्रकाश कदम यांना अति उत्कृष्ट गुन्हा दोषसिद्धीचे पारितोषिक देण्यात आले.

गुन्ह्यातील मालमत्ता उत्कृष्टरित्या हस्तगत केल्याप्रकरणी मालमत्ता कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांना गौरवण्यात आले त्यांनी २०१७ मध्ये घरफोडी करणार्‍या एका गुन्हेगाराला अटक करून गुन्ह्यातील जवळपास सर्वच मुद्देमाल जप्त केला होता. चोरी करण्यात आलेल्या साडेतीन किलो सोन्यापैकी सव्वा तीन किलो सोने त्यांनी हस्तगत केले होते, तसेच कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले डोंगरी पोलीस ठाण्यातले अजय प्रभाकर गावंड यांच्या पत्नीलादेखील सन्मानित करण्यात आले आहे.

कमला मिल दुर्घटनेत स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता आगीत घुसून लोकांचे प्राण वाचवणार्‍या वरळी पोलीस ठाण्यातल्या धाडसी पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे यांना धैर्याने हाताळलेल्या कायदा व सुव्यवस्थेसाठी गौरवण्यात आले असून, आझाद मैदान अमली पदार्थ विरोधी पथकातले पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याप्रकरणी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाहतूक पोलीस दलात काम करणारे आणि उत्कृष्ट कामगिरी बजावलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास भाबल आणि पोलीस नाईक चेतन कदम यांनादेखील सन्मानित करण्यात आले आहे.

लोकांना सामाजिक संदेश देऊन जनजागृती केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे आणि सहायक पोलीस आयुक्त गजानन शेलार यांनासुद्धा गौरवण्यात आले आहे. सायबर गुन्ह्यांत उत्कृष्ट तपास केल्याप्रकरणी वनघर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले आणि लहान मुलांशी निगडित असणार्‍या गुन्ह्यांचा उल्लेखनीय तपास केल्याप्रकरणी युनिट ११ चे पोलीस निरीक्षक रईस शेख यांना सन्मानित करण्यात आले आहे. शुक्रवारी हा सोहळा अगदी उत्साहात पार पडला असून, अशा कार्यक्रमांमुळे पोलीस दलातल्या अधिकार्‍यांमध्ये काम करत राहण्याची ऊर्जा निर्माण होत राहते, असे मत पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here