घरमुंबईरात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास करोनाबाधितांचे सर्वाधिक मृत्यू

रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास करोनाबाधितांचे सर्वाधिक मृत्यू

Subscribe

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणार्‍या बहुतेक करोना रुग्णांचा मृत्यू रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार थांबण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी आरोग्य प्रशासनाला काही सूचनाही केल्या आहेत.

रात्री १ ते पहाटे ५ या कालावधीमध्ये रुग्ण प्रसाधनगृहामध्ये जाण्यासाठी ऑक्सिजन यंत्र काढून जातात. नेमके त्यावेळी अनेक मृत्यू घडले आहेत, असे सांगतानाच प्रत्येक रुग्ण शय्येला ( बेड) एक मलपात्र असणे आवश्यक आहे. किमान ४ बेड समवेत शौचकूप असावेत. कार्डबोर्डपासून बनवलेले मलपात्र देखील वापरले जाऊ शकते. याबाबत प्रत्येक सेवेकर्‍याने आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. व्हिडिओ यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णावर विभाग प्रमुख आणि संस्था प्रमुख यांनी बारकाईने लक्ष ठेवावे आणि कुठेही विलंब होणार नाही, कोणतीही कमतरता राहणार नाही याची वेळोवेळी खात्री करावी. प्रत्येक मृत्यू प्रकरणाबाबत सविस्तर परीक्षण केले जावे आणि गरजेनुसार न्यायवैद्यकीय परीक्षणासाठी व्हिडिओ तयार ठेवावा, अशा सूचनाच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

महापालिकेने पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे प्राण वाचावे म्हणून ‘प्राण वाचवा’ हा कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत, मध्यम तीव्र आणि तीव्र स्वरूपाची बाधा असलेल्या प्रत्येक रुग्णांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून उपचार करण्यात यावेत. अशा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत वरिष्ठ आणि कनिष्ठ डॉक्टरांनी दिवसातून किमान दोन वेळा व्हिडिओ किंवा टेलिफोनच्या माध्यमातून संपर्कात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व रुग्ण हे डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित आरोग्य कर्मचारी यांची सांघिक जबाबदारी असेल.

अशा रुग्णाची करोना उपचारांसह संपूर्ण पूरक काळजीही घेतली गेली पाहिजे. निश्चित करून दिलेल्या वैद्यकीय कार्यपद्धतीनुसार प्रत्येक कागदपत्रे/दस्तावेज पडताळावीत, जेणेकरून प्रत्येक प्रक्रियेचे पालन केले जात असल्याची खातरजमा होवून कोणतीही बाब शिल्लक राहणार नाही. विषाणू रोधी (antiviral), IL6, स्टिरॉइड, प्लाझ्मा यासह औषधांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करावी आणि त्यांचा योग्य उपयोग करावा, असे आदेशही चहल यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -