घरमुंबईहॉस्पिटलने मृतदेहच बदलला जिवंत व्यक्तीचाही दुर्दैवी मृत्यू

हॉस्पिटलने मृतदेहच बदलला जिवंत व्यक्तीचाही दुर्दैवी मृत्यू

Subscribe

ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलचा सावळा गोंधळ

कोरोनाच्या काळात हॉस्पिटलकडून रुग्णांना प्रवेश नाकारला जात असताना आता तर मृतदेहही बदलण्याची घटना ठाण्यात उजेडात आली आहे. ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित भालचंद्र गायकवाड या ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असताना जनार्दन सोनावणे ठरवून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर भालचंद्र गायकवाड हे हरवले आहेत असे जाहीर करून त्याची पोलीस तक्रार करण्यात आली. भालचंद्र गायकवाड यांना जनार्दन सोनावणे ठरवून सोनावणे कुटुंबियांनी त्यांचे अंत्यसंस्कारही केले. त्यानंतर तब्बल दोन दिवसांनी जनार्दन सोनावणे हे जिवंत असून अंत्यसंस्कार केलेले भालचंद्र गायकवाड आहेत हे हॉस्पिटलकडून उघड करण्यात आले. यादरम्यान जनार्दन सोनावणे यांचाही मंगळवारी मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या या सावळा गोंधळामुळे गायकवाड आणि सोनावणे कुटुंबियांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला.

ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 29 जून रोजी जनार्दन सोनावणे आणि भालचंद्र गायकवाड हे एकाच दिवशी अ‍ॅडमिट झाले होते. हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांनी 3 जुलै रोजी सोनावणे कुटुंबियांना फोन करून जनार्दन यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर सोनावणे कुटुंबियांनी जनार्दन यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यावर अंत्यसंस्कारही केले. मात्र, कोरोना सेंटरमध्ये दाखल झालेले भालचंद्र गायकवाड यांचा त्यांच्या नातेवाईकांना शोध लागेना. दोन दिवस त्यांचा शोध सुरू होता. यावरून ठाण्यातील वातावरण चांगलेच गरम झाले होते. कापुरबावडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रारही दाखल करण्यात आली. तर भाजपने गायकवाड यांचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला अल्टीमेटम दिला. महापौर नरेश म्हस्के यांनी देखील प्रशासनावर या संदर्भात आगपाखड केली. या घडामोडी सुरू असताना सोनावणे यांच्या कुटुंबियांना पुन्हा हॉस्पिटलमधून फोन आला. जनार्दन सोनावणे जिवंत असून ते कोरोना सेंटरमध्येच आहेत. ज्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ते भालचंद्र गायकवाड होते.

- Advertisement -

7 जुलै रोजी पोलीस स्टेशनमध्ये जनार्दन सोनावणे यांच्या नातेवाईकांना बोलावून ओळख परेड घेण्यात आली. तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला होता. मात्र, भालचंद्र गायकवाड यांच्या घरात हल्लकल्लोळ झाला होता. भालचंद्र गायकवाड यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आल्याचे कोरोना सेंटरमधून त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यामुळे गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ग्लोबल हॉस्पिटल प्रशासनाने दोन्ही कुटुंबांची माफी मागितली.

दरम्यान, प्रशासनाच्या या सावळा गोंधळातून जनार्दन सोनावणे कुटुंब सावरत असतानाच हॉस्पिटलमधून मंगळवारी रात्री उशिरा फोन करून, त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे आधी सोनावणे म्हणून ज्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ते सोनावणे नव्हतेच, यातून सावरत असतानाच जनार्दन सोनावणे गेल्याचा फोन आल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या पाया खालचीच वाळू सरकली. हॉस्पिटल प्रशासनाने सोनावणे आणि गायकवाड कुटुंबाच्या भावनेशीच खेळण्याचा प्रकार केला. त्यामुळे यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानचे सदस्य उन्मेश बागवे यांनी केली आहे. या दोन्ही कुटुंबांना 50 लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे करण्यात आली आहे.

- Advertisement -

सोनावणे यांच्यावर मोरे नावाने उपचार
जनार्दन सोनावणे यांना 29 जून रोजी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या आदल्या दिवशी मोरे नावाच्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर सोनावणे यांच्यावर मोरे यांच्या नावाने उपचार सुरू होते. अशी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -