घरमुंबईआकड्याद्वारे राज्यातील वीजचोरी निकालात

आकड्याद्वारे राज्यातील वीजचोरी निकालात

Subscribe

विजेसाठी आकडे टाकून वीज चोरी करण्याचा महाराष्ट्रातील आकडा पॅटर्न यापुढच्या दिवसात रद्द होण्याच्या मार्गावर आहे. हाय वोल्टेज डिस्ट्रिब्युशन स्किम (एचवीडीएस) योजनेमुळे विजेची चोरी थांबतानाच ग्राहकांना अखंडीत वीजपुरवठाही मिळणे शक्य होईल. महत्वाचे म्हणजे वीज यंत्रणेवर येणार्‍या अतिदाबामुळे यंत्रणेचे होणारे मोठे नुकसान कमी होण्यासाठीही मदत होईल.

एकाच विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर अनेक विजेच्या जोडण्यांमुळे प्रमाणापेक्षा जास्त लोड येऊन ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकार समोर आले आहेत. हे प्रकार कमी करण्यासाठीच तसेच अतिरिक्त आकड्यांच्या माध्यमातून होणारे वीज चोरीचे प्रकार रोखण्यासाठी एचवीडीएस योजना उपयुक्त ठरणार आहे. या योजनेअंतर्गत अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनीचा वापर करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे उच्च दाब वाहिनीमुळे आकडे टाकण्यासारख्या प्रकारांवर नियंत्रण आणणे शक्य होईल. तसेच एक ट्रान्सफॉर्मर हा कमाल दोन शेतकर्‍यांमध्ये देण्यात येईल. त्यामुळे आपल्याला दिलेल्या ट्रान्सफॉर्मरवर शेतकर्‍यांचीही देखरेख असेल. आकडा टाकण्याचा प्रकार झाला तरीही उपकरणावर जास्त दाबाने वीज मिळाल्यामुळे ते खराब होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

उच्च दाबाच्या वाहिनीमुळे शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत वीज पोहचवताना होणारी विजेची हानी कमी करण्यासाठीही मदत होणार आहे. संपुर्ण वर्षभरात १ लाख ८० हजार कृषीपंप ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे उदिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे.
एचवीडीएस यंत्रणेमुळे महावितरणच्या विजेच्या देयकाच्या यंत्रणेतही सुधारणा होईल. त्यामुळे विजेच्या बिलाशी संबंधित तक्रारीही कमी होतील. तसेच वारंवार विजेची वाहिनी दुरूस्त करण्याचे प्रकारही कमी होतील असा महावितरणचा अंदाज आहे.

ज्याठिकाणी महावितरणची यंत्रणा याआधीच पोहचली आहे अशा ठिकाणी नव्या ग्राहकांना वीज जोडणी देतानाच एचवीडीएस योजनेतूनच देण्याचा महावितरणचा मानस आहे. सध्या महावितरणने या योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्यासाठी निविदा प्रक्रिया पुर्ण केली असून चार ते पाच एजन्सीच्या माध्यमातून राज्यातील वीज ग्राहकांना एचव्हीडीएस योजनेअंतर्गत जोडणी देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ८५० कोटी रूपये राज्य सरकारमार्फत गुंतवण्यात येणार आहेत.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -