घरमुंबईमहापौर बंगल्यात शेवटची ‘दिवाळी संध्या’

महापौर बंगल्यात शेवटची ‘दिवाळी संध्या’

Subscribe

प्रतिनिधी:- महापौर बंगला… मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून मान असलेले मुंबईचे महापौर या बंगल्यात राहतात. गेली अनेक वर्षे शिवाजी पार्क येथे असलेल्या या महापौर बंगल्याने जसे अनेक महापौर पाहिलेत, तसेच अनेक सणदेखील या इमारतीत साजरे झाले. महापौर बंगल्यातील दिवाळीला तसेच खास वैशिष्ठ्य आहे. दरवर्षी ‘दिवाळी संध्या’ याच महापौर बंगल्यात साजरी होते. यावेळी पालिकेतील अधिकारी, पत्रकार उपस्थित असतात. यंदा शिवाजी पार्क येथील या महापौर बंगल्यात शेवटची दिवाळी साजरी करण्यात आली. होय शेवटची दिवाळी. कारण या दिवाळीनंतर महापौर बंगल्यात महापौरांची दिवाळी साजरी होणार नाही. त्याचे कारणही तसेच आहे.

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक या महापौर बंगल्याच्या जागेत होणार असून लवकरच महापौर बंगला सोडून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना राणीच्या बागेतील बंगल्यावर स्थलांतरित व्हावे लागणार आहे. त्यामुळे आता पुढील दिवाळी ही या जुन्या महापौर बंगल्याऐवजी राणीच्या बागेतील बंगल्यात साजरी होणार आहे. दरम्यान, सोमवारी महापौर बंगल्यात ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच इतर शिवसेनेचे नेते, पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

यशवंत जाधवांनी गायलं ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ 

दरम्यान, महापौर बंगल्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी संध्या कार्यक्रमात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी गायलेले ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ हे गाणे मात्र चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. जाधव यांनी गायलेल्या या गाण्यामुळे उपस्थितांचे डोळे विस्फारले आहेत. खरं तर या कार्यक्रमाची सुरूवात यशवंत जाधव यांच्या गाण्याने झाली. यशवंत जाधव यांनी जगाच्या पाठीवर या सिनेमातील ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ हे गाणे म्हटले. मात्र, त्यांनी गायला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू झाली.

‘उद्धवा अजब तुझे सरकार’ हे गाणे मी गायलो आहे. हेच गाणे 1997 ला पण मी गायलो होतो. तेव्हा अलिबागमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत मी हे गाणे गायलो होतो. या गाण्यातील उद्धव या नावाचा आणि पक्षप्रमुखांचा काही संबंध नाही. हे गाणे ग.दि. माडगुळकरांचे असून ज्यांना गदिमा माहीत नाहीत,ते लोक गाणे व्हायरल करत आहेत. -यशवंत जाधव,स्थायी समिती अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -