TRP घोटाळ्यातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

अटकेत

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी एका मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. विनय त्रिपाठी असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. यापूर्वी शिरीष सतीश पट्टनशेट्टी, नारायण नंदकिशोर शर्मा, विशाल वेद भंडारी आणि बोमपेल्ली राव मिस्त्री या चौघांना पोलिसांनी अटक केली असून ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. विनयची ट्रॉन्झिंट रिमांड घेऊन त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाईल.

दरम्यान, या संपूर्ण घोटाळ्यातील व्यवहाराची फॉरेन्सिक ऑडिटरकडून तपासणी होणार आहे. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा चॅनेल्सचे बँक खाती गोठवण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीला सुरुवात केली आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यांच्या चौकशीतून या घोटाळ्यातील साखळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यामुळे रविवारी सहाजणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवले होते. समन्स मिळताच रिपब्लिक नेटवर्कचे सीईओ विकास खानचंदानी आणि सीओओ हर्ष भंडारी यांची पोलीस मुख्यालयात तर मुख्य वितरक धनश्याम सिंग यांची दमण येथे गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अटकसत्र सुरु केल्याने काही आरोपी मुंबईतून पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे सात विशेष पथक विविध राज्यात पाठवण्यात आले होते. त्यातील उत्तर प्रदेशात गेलेल्या पथकाने या कटातील मुख्य आरोपी विनय त्रिपाठी याला अटक केली.

गुन्हा दाखल झाल्यांनतर विनय हा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर शहरात लपून बसला होता. त्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष कोतवाल, प्रकाश होवाळ, नितीन लोंढे, सुभाष मुठे, यांनी त्याला मिर्झापूर येथून अटक केली. त्याला कोर्टात हजर करुन ट्रॉन्झिंट रिमांड घेतले जाणार आहे. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. विनय हा पूर्वी हंसा कंपनीत कामाला होता. दोन वर्षांपूर्वी त्याने ही कंपनी सोडली होती. तो विशाल भंडारीचा खास सहकारी असून त्याला विनय हा पैसे देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. इतर दोन पथक उत्तर प्रदेश, एक पथक राजस्थान येथे गेले असून तिथे लपलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दुसरीकडे टीआरपी घोटाळाप्रकरणी सोमवारी हंसा कंपनीचे सीईओ प्रवीण निझार आणि डेप्युटी मॅनेजर नितीन देवकर यांची गुन्हे शाखेने चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. रात्री उशिरापर्यंत त्यांची जबानी नोंदवण्याचे काम सुरु होते.

रिपब्लिक नेटवर्कच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना कागदपत्रासह हजर राहण्याचे आदेश देण्यात आहे. तर सीएफओ हे दिल्लीतून मुंबईत आल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. या संपूर्ण घोटाळ्याची मुंबई पोलीस फॉरेन्सिक ऑडिटरकडून चौकशी करणार आहे. त्यासाठी लवकरच ऑडिटरची नेमणूक करण्यात येणार आहे. चॅनेल्सच्या बँक व्यवहाराची माहिती तपासून त्याचा अहवाल मुंबई पोलिसांना सादर करण्यास फॉरेन्सिक ऑडिटरला सांगण्यात येईल. याच गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेल्या फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनेल्सचे बँक खाती आता पोलिसांनी गोठवली आहे. या दोन्ही चॅनेल्सचे चार खाती असून त्यात गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. या दोन चॅनेल्ससह इतर काही खासगी चॅनेल्स पोलिसांच्या रडारवर असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा –

Mumbai Power Cut: वीज पुरवठा खंडित कसा झाला? तातडीने चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश