घरमुंबईमुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघड !

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघड !

Subscribe

युवासेनेने केले कल्याण उपकेंद्राचे अनौपचारीक उद्घाटन

ठाण्याच्या पलिकडे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे मानल्या जाणार्‍या मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेद्रांचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. उपकेंद्राच्या उद्घाटनाला विद्यापीठ प्रशासनाला मुहूर्त सापडत नसला तरी उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र शुक्रवारी युवासेनेने उपकेंद्राचे अनौपचारीक उद्घाटन केले. मात्र यावेळी उपकेंद्राच्या वास्तुतील अनेक कामे अर्धवट स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघड पडले आहे. उपकेंद्राच्या वास्तुचे काम अर्धवट स्थितीत असतानाही, विद्यापीठ प्रशासनाला सुरू करण्याची लगीनघाई का ? असाच सवाल युवासेनेने केला आहे.

मुंबई विद्यापीठाचे कल्याण येथील उपकेंद्र सुरू व्हावे, यासाठी २००७ साली केडीएमसीने ठराव केला होता. २०१० साली तत्कालिन उच्च शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते भुमीपूजनही करण्यात आले होते. कल्याण उपकेंद्र सर्वसोयी सुविधांसह उपलब्ध व्हावे यासाठी युवासेनेचे सिनेट सदस्य गेल्या सहा ते सात वर्षांपासून विद्यापीठाकडे पाठपुरावा करत आहेत. कल्याण -डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेने १० एकरचा भूखंड विद्यापीठासाठी आरक्षित केला होता. त्या जागेवर कल्याण उपकेंद्राची वास्तू उभी राहिली आहे. मात्र वास्तू तयार असतानाही त्याच्या उद्घाटनासाठी विद्यापीठाला मुहूर्त मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वीच केडीएमसी प्रशासनाने उपकेंद्राची जागा परत घेण्याचा इशारा विद्यापीठाला दिला होता. त्यावेळी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी कल्याणात येऊन उपकेंद्राची पाहणी केली होती. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून उपकेंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाने कोणतेही अधिकृत उद्घाटन न करता उपकेंद्र सुरू केले आहे. त्यामुळे युवासेनेने उपकेंद्राचे अनौपचारीक उद्घाटन केले. त्यावेळी उपकेंद्रातील इलेक्ट्रीकची कामे, सिलींगची तसेच वॉशरूममधील अनेक कामे ही अर्धवट स्थितीत असल्याचे युवा सेनेच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

कल्याणच्या गांधारी येथे दहा एकर जागेवर उपकेंद्र साकारण्यात आले आहे. कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, आणि शहापूर या सहा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मुंबईत जायला लागू नये म्हणून कल्याणमध्येच सर्व सोयी सुविधा उपलबध होणार आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली ते कर्जत आणि कसारा परिसरातील १५० महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -