कुर्ल्यातील केंद्रातून दहावीची मराठी उत्तरपत्रिका गहाळ

अंजुमन इस्लाम हायस्कूलमधील धक्कादायक प्रकार

Mumbai
SSC Board Re Exam
प्रातिनिधिक फोटो -

सध्या दहावी बोर्डाची परीक्षा सुरू आहे दुसर्‍याच दिवशी म्हणजे मागील शनिवारी एका विद्यार्थिनीच्या मराठी पेपरची उत्तरपत्रिका केंद्राकडून गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला पश्चिम येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित केंद्राने पोलीस ठाण्यात उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली, अशी माहिती कुर्ला पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकार्‍याने आपलं महानगरला दिली.

कुर्ला पश्चिम येथील मोरेश्वर पाटणकर उर्दू माध्यमिक शाळेत शिकणार्‍या दहावीच्या एका विद्यार्थिनीचे कुर्ल्यातील अंजुमन इस्लाम हायस्कूल हे परीक्षा केंद्र आहे. शनिवारी दहावी बोर्डाचा मराठी विषयाचा पेपर सुरू होता. परीक्षेचा वेळ संपल्यानंतर केंद्रातील पर्यवेक्षकाने या विद्यार्थीनीसह इतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या. सर्व विद्यार्थी गेल्यानंतर जमा केलेल्या उत्तरपत्रिका क्रमवार लावत असताना एका विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका सापडत नसल्याचे पर्यवेक्षकाच्या लक्षात आले.

पर्यवेक्षकाने पुन्हा पुन्हा उत्तरपत्रिका पडताळून पाहिल्या, मात्र एक उत्तरपत्रिका सापडत नसल्याचे पर्यवेक्षकाने शाळेतील केंद्र प्रमुखाच्या लक्षात आणून दिले. केंद्र प्रमुखाने शाळेतील कर्मचार्‍यांच्या मदतीने प्रत्येक वर्गात गहाळ झालेल्या उत्तर पत्रिकेचा शोध घेतला, मात्र उत्तरपत्रिका न सापडल्यामुळे अखेर केंद्र प्रमुखाने कुर्ला पोलीस ठाण्यात धाव घेऊन उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली. कुर्ला पोलिसांनी पाटणकर शाळेत दहावीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीची मराठीची उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

केंद्र प्रमुखांकडून याबाबत अद्याप अहवाल आलेला नाही. केंद्र प्रमुखाचा अहवाल आल्यानंतर चौकशी समिती स्थापन करून निर्णय घेण्यात येईल. परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक व संबंधित विद्यार्थिनीची चौकशी करण्यात येईल. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडू नये यासाठी परीक्षा झाल्यावर चौकशी करण्यात येईल.
– शरद खंडागळे, सचिव, एसएससी बोर्ड.

कुर्ल्यातील अंजुमन इस्लाम या शाळेने दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीची मराठी पेपरची उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची तक्रार कुर्ला पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. सदर विद्यार्थिनी दुसर्‍या शाळेतील दहावीची विद्यार्थिनी आहे. दहावी बोर्डाची उत्तरपत्रिका गहाळ होणे ही गंभीर बाब असून या प्ररकरणी आम्ही जातीने लक्ष घालत आहोत.
– चौकशी करणारा पोलिस अधिकारी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here