घरमुंबईमेहुण्याची भावोजीकडून भोसकून हत्या

मेहुण्याची भावोजीकडून भोसकून हत्या

Subscribe

बहिणीला त्रास देण्याचा जाब विचारण्यासाठी गेला आणि जीव गमावला

महालक्ष्मी येथे विनोद विजय मोखरा या 40 वर्षांच्या मेहुण्याची त्याच्याच भावोजीने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी भावोजीला अटक केली आहे. राजेश लक्ष्मण भोराची असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बहिणीला त्रास देण्याचा जाब विचारण्यासाठी विनोद हा गेला होता. मात्र, त्यात त्याचा जीव गेल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना सोमवारी सायंकाळी पावणेआठ वाजता महालक्ष्मी येथील सातरस्ता, धोबीघाट, जे. आर मार्गावरील जे इमारतीसमोर घडली.

विनोद मोखरा हा आग्रीपाडा येथील साने गुरुजी मार्गावरील शिशमलच्या दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 142/37 मध्ये राहतो. त्याची बहीण हंसा हिचा राजेशसोबत विवाह झाला होता. मात्र घरगुती कारणावरुन तो तिचे सतत मानसिक व शारीरिक शोषण करीत होता. तिला सतत मारहाण करीत होता. या छळाला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने भाऊ विनोद याच्याकडे तक्रार केली. त्याचा जाब विचारण्यासाठी विनोद हा सोमवारी महालक्ष्मी येथे आला होता. यावेळी या दोघांमध्ये प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर राजेशने विनोदवर चाकूने वार केले होते. छातीवर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

याप्रकरणी विनोदचा भाऊ गिरधर विजय मोखरा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी राजेश भोराची याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -