घरमुंबईघाटकोपरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या

घाटकोपरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या

Subscribe

मारेकर्‍यांमध्ये निलंबित पोलीस अधिकार्‍याचा समावेश

क्षुल्लक वादातून एका तरुणाला चार जणांनी मारहाण करून त्याला उचलून नाल्याच्या भिंतीवर फेकून ठार मारल्याची घटना घाटकोपर पश्चिम येथे घडली आहे. या हत्येत एका निलंबित पोलीस अधिकार्‍याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दापोली येथून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गणेश म्हस्के (२५) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा घाटकोपर येथील साईनाथ नगर येथे राहण्यास होता. बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास गणेश हा मोटारसायकलवर साईनाथ नगर येथील नाल्याजवळ मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्याचवेळी एका मोटारीतून चार जण उतरले. त्यांनी गणेशला मोटारसायकल बाजूला घेण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून या चौघांनी गणेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला उचलून नाल्याच्या भिंतीवर फेकून त्यांनी पळ काढला. गणेशचे डोके भिंतीवर आदळल्याने तो नाल्यात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर गणेशचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढून राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.

- Advertisement -

पोलिसांना घटनास्थळी मारेकर्‍यांनी सोडून गेलेली मोटार मिळून आली. या मोटारीवरून मारेकर्‍यांचा शोध घेतला असता मारेकरी हे त्याच परिसरातील राहणारे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी मारेकरी हे दापोली येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दापोली येथे जाऊन तिघांना रात्री उशिरा मुंबईत आणले आहे. या हत्येमध्ये एका निलंबित पोलीस अधिकार्‍याचा समावेश असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येचे कारण वेगळेच असून मृत गणेश हा निलंबित पोलीस अधिकार्‍याच्या भाचीवर एकतर्फी प्रेम करीत होता, तिला तो जात येता त्रास देत असल्यामुळे तिने याबाबत घरच्यांकडे तक्रार केली होती, अशी माहितीदेखील समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -