चिऊताई उडाली भुर्रर्र…

चिमणी वाचवण्यासाठी प्रयत्नांची गरज

Mumbai
Sparrows Day

शहरीकरणामुळे होत असलेल्या वृक्षतोडीचा प्रभाव समस्त प्राणीमात्रांवर होत आहे. सध्या निसर्गातून अनेक प्राणी लुप्त होऊ लागले आहेत. त्यातच सर्वात आवडती चिमणीही आता दिसेनासी झाली आहे. पुढील काळात चिऊताई फक्त चित्रातूनच दिसणार की काय, अशी शंका संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती परब यांनी व्यक्त केली.

19 मार्च रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिक्षेत्र येऊर या ठिकाणी जागतिक चिमणीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वनअधिकारी राजन खरात, सुजय कोळी, विकास कदम, यांच्यासह रमाकांत मोरे, राकेश शेलार, सुशिल रॉय, डॉ.राज परब प्रणाली गिरी आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

आज प्रत्यक्ष जंगलात असतानाही आपल्याला चिमणीचे दर्शन होत नाही, याचा अर्थ काय तो आपण समजून घेतला पाहिजे. तेव्हा आता झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र आपण आत्मसात करूया आणि निसर्ग वाचवुया, तरच चिऊताई आपल्याला दिसतील. याची सुरुवात आपल्याकडूनच करू या, असे आवाहन परब यांनी केले.

दोन वर्षांपूर्वी चिमणी बचाव मोहिमेची सुरुवात ठाण्यातील संकल्प इंग्लिश स्कूलच्यावतीने करण्यात आली. 20 मार्च चिमणी दिनाचे औचित्य साधून 2017 या वर्षी विद्यार्थ्यांनी तयार केलेली हजारो घरटी ठाणे शहरात वाटप करण्यात आली होती. त्यानंतर मागील वर्षी ‘चिमणी’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित करून चिऊताईबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही परंपरा पुढे सुरू ठेवत यावर्षी चिमणी दिनाचे औचित्य साधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या सहकार्याने येथील वन विभागाच्या हद्दीत ठीकठिकाणी चिमण्यांसाठी घरटी लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संकल्प इंग्लिश स्कूलचे अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. 20 मार्च रोजी होळी असल्याने एक दिवस आधीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here