घरमुंबईउपचारावेळी मृत्यू झाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांचा उद्रेक

उपचारावेळी मृत्यू झाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांचा उद्रेक

Subscribe

कोपरीतील आरोग्यम हॉस्पिटलमध्ये तणाव

ठाण्याच्या कोपरीतील आरोग्यम हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा उपचारावेळी मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. हा मृत्यू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. रुग्णालयाने जाणीवपूर्वक उशिरा कळवल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी या रुग्णालयात गोंधळ घातला. यामुळे संपूर्ण रुग्णालयात तणावपूर्ण आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर या प्रकरणी कोपरी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
साईनाथ नगर परिसरात राहणारे प्रकाश सहादू घाडगे (वय ५४) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांना रविवारी २४ डिसेंबरला मध्यरात्री आरोग्यममधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी २५ डिसेंबरला रात्री पावणे नऊच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. अहमद या शिकाऊ डॉक्टरने याबाबत त्यांच्या नातेवाइकांना उशिरा कळवल्याने येथे प्रचंड तणाव निर्माण झाला.

प्रकृती सुधारत असताना अचानक घाडगे यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले. डॉक्टरांनी दिलेल्या विसंगत माहितीमुळे नातलग आणि जमलेल्या शेकडोच्या जमावाने आरोपांच्या फैरी झाडत रुग्णालयच बंद करण्याची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यामुळे रुग्णालय परिसराला छावणीचे स्वरुप आले. अखेर प्रकाश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला. हलगर्जीपणाबाबत रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञही नव्हता
प्रकाश घाडगे यांना २४ डिसेंबर रोजी रात्री १.३० च्या सुमारास छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे हॉस्पिटलात दाखल केले होते. इसीजी आणि इतर तपासणीत त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे उघड झाले. यासाठी मंगळवारी त्यांची अँजिओग्राफी होणार होती. मात्र २४ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजता त्यांना पुन्हा त्रास झाला. अवघ्या काही तासातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर रात्री ९.३० च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना त्रास होत असताना रुग्णालयात कोणीही हृदयरोगतज्ज्ञ उपलब्ध नव्हते. प्रकृती सुधारत असताना अचानक त्यांचा मृत्यू ओढावलाच कसा? रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर हृदयविकारतज्ज्ञ डॉक्टरांना का पाचारण केले नाही. रुग्णालयाचा हा हलगर्जीपणा आहे. यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.
– सतीश घाडगे, रुग्णाचे भाऊ

रुग्णालयाने हलगर्जीपणा केलाच नाही
रुग्णालयाचे दुर्लक्ष झालेले नाही. रुग्णालय आपल्यापरीने योग्य ती काळजी घेतच होते. सोमवारी सकाळी प्रकाश घाडगे हे रुग्णालयासमोरच बेशुद्ध झाल्याने रुग्णालयाने पुढाकार घेत त्यांना दाखल करून घेतले. दिवसभरात उपचार करताना हृदयविकारतज्ज्ञांनी त्यांची पाहणी केली. दुसर्‍या दिवशी उर्वरित चाचण्या करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता. मात्र सायंकाळनंतर पुन्हा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
– अभय गायकवाड, संचालक, आरोग्यम हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -