घरमुंबईवाघाच्या पिंजर्‍यातही उभारणार उद्यान

वाघाच्या पिंजर्‍यातही उभारणार उद्यान

Subscribe

नैसर्गिक वातावरणासाठी दीड कोटींचा खर्च

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा कायापालट होत असून यातील प्राण्यांना निसर्गरम्य अशा मोकळ्या वातावरणात नैसर्गिक जीवन जगता यावे, याच दृष्टीकोनातून पिंजर्‍यांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे याठिकाणी वाघाच्या पिंजर्‍यातही नैसर्गिक वातावरण तयार करून त्यामध्ये झाडेझुडपे आणि बांबूचा वापर करून उद्यान विकसित केले जाणार आहे. मात्र, पिंजर्‍यांतील हे नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यासाठी तब्बल सव्वा कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी व पक्ष्यांसाठी नवीन १७ अद्ययावत पिंजरे बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेवून त्यांच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली.

यामध्ये १५ पिंजरे हे प्राण्यांसाठी, तर २ पिंजरे हे पक्ष्यांसाठी आहे. त्यातील बारशिंगा,तरस, कोल्हा आदी प्राणी राणीबागेत दाखल झाल्यानंतर त्यांना या पिंजर्‍यात दर्शनात ठेवण्यात आले आहे. तर मागील दोन आठवड्यापूर्वी औरंगाबादमधील प्राणिसंग्रहालयातून करिश्मा आणि शक्ती अशी वाघांची जोडी राणीबागेत दाखल झाली. या वाघाच्या जोडीला सध्या देखरेखीखाली क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असले तरी लवकरच राणीबागेतील मोकळ्या वातावरणातील पिंजर्‍यात या वाघांची रवानगी करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंजर्‍यतील या वाघांच्या हरकती मुंबईकरांना न्याहाळता येणार आहे.

- Advertisement -

या वाघाच्या पिंजर्‍याचे काम पूर्ण झाले असले तरी त्यामध्ये नैसर्गिक वातावरण तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे वाघाचे नैसर्गिक अधिवास असलेल्या पिंजर्‍याची निर्मिती करण्यात येत आहे. त्याकरता पिंजर्‍यातील अंतर्गत भागात झाडे,झुडपे, वृक्ष, वेली तसेच बांबूंसह हिरवळ निर्माण करण्यात येणार आहे. एकप्रकारे वाघासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाणार आहे. शिवाय पिंजर्‍याच्या बाहेरील बाजुसही उद्यान सुशोभित करून शोभिवंत झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या उद्यानाच्या विकासासह पुढील काळांमध्ये याची देखरेख करण्यासाठी महापालिकेच्यावतीने डी.बी.इन्फ्राटेक या कंपनीची निवड करून त्यावर १ कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

वाघाचा नैसर्गिक वातावरणात राहता यावे यासाठी वाघाच्या पिंजर्‍यात बांबूंसह झाडे,झुडपे तसेच हिरवळ लावण्याचे काम स्थायी समितीच्या मंजुरीने हाती घेण्यात येत आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर, हे काम महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर त्यामध्ये वाघांना त्यात सोडण्यात येईल. मात्र, सध्या ते क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. शिवाय या उद्यानातील झाडे त्यांच्या सहवासामुळे मृत पावल्यास त्या झाडांची देखभाल प्रत्येक बुधवारी सुट्टीच्या दिवशी केली जाईल,असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. अनिल त्रिपाटी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

तिसर्‍या टप्प्यातील कामेही लवकरच
या तिसर्‍या टप्प्यातील विस्तारीत प्राणिसंग्रहालयात विदेशी प्राणी व पक्ष्यांचा समावेश असेल. यामध्ये जग्वार, चित्ता, पांढरा सिंह, पाणघोडा, वॅलेबी, झेब्रा, मॅड्रील मंकी, ओकापी, इमू, शहामृग, पक्षीगृह-३ आणि चिंपाझी लेसर फ्लेमिंगो, रिंगटेल लेमूर इत्यांदींचे पिंजरे बनवण्यात येणार आहे. यासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -