घरमुंबईडॉक्टर तुम्ही सुद्धा!

डॉक्टर तुम्ही सुद्धा!

Subscribe

ब्रेन हॅमरेज झाल्याने सोमवारी पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्यानेच मृत्यू झाल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर आरोप केलाय .

ब्रेन हॅमरेज झाल्याने सोमवारी पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शिवाजी सावंत यांचा गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास मृत्यू झाला. डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप शिवाजी सावंत यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विक्रोळी पार्कसाईट येथे राहणारे शिवाजी सावंत हे दादर येथील फुल मार्केटमध्ये हमाल म्हणून काम करत होते. सावंत यांची मागील आठवड्यात अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने जवळील स्वप्ना या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध तपासण्यांनंतर त्यांना ब्रेन हॅमरेज झाले आहे. त्यांची तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सावंत यांच्या कुटुंबियांना सांगितले. परंतु अगोदरच्या उपचारासाठी तब्बल एक लाख 40 हजार रुपये खर्च झाला होता. पुढील उपचार खासगी रुग्णालयात परवडणारे नसल्याने त्यांना सोमवारी केईएम रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वॉर्डमध्ये जागा नसल्याचे सांगत दाखल करून घेण्यास नकार दिला, परंतु डॉक्टरांना बरीच विनंती केल्यानांतर त्यांनी दाखल करून घेतले, असे सावंत यांचा मुलगा सचिन याने सांगितले.

नातेवाईकांचा आरोप

- Advertisement -

बाबांना रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतरही डॉक्टर त्यांना तुम्ही घरी घेऊन जा…असेच सांगत होते. सोमवारी बाबांना दाखल केल्यानंतर न्यूरॉलॉजीच्या डॉक्टरांनी त्यांचा सीटी स्कॅन काढण्यास सांगितले. मात्र बाबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने ’इमर्जन्सी’ असे लिहून न दिल्याने सीटी स्कॅन विभागातून गुरुवारी बोलावण्यात आले. पण नंतर बाबांची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून त्यांनी सीटी स्कॅन तातडीने करण्यास सांगितले. परंतु ते पेपरवर तसे लिहून देत नव्हते. त्यामुळे तातडीने सीटी स्कॅन करता येत नव्हते. मंगळवारी रात्री बाबांची प्रकृती बिघडल्याने बुधवारी सीटी स्कॅन विभागातील डॉक्टरांकडे विनंती करून सीटी स्कॅन केले. मात्र त्या दरम्यान त्यांना लघवी होणे बंद झाल्याने त्यांचे पोट फुगू लागले होते. याबाबत डॉक्टरांना वारंवार सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे तर त्यांचा त्रास अधिक वाढल्यानंतरही डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले नाहीत. बुधवारी रात्री त्यांची तब्येत अधिकच बिघडली. त्यानंतर डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण ते उचलत नव्हते. अखेर ४५ मिनिटांनी डॉक्टरांनी फोन उचलला व त्यानंतर ते वॉर्डमध्ये आले. पण तोपर्यंत सावंत यांचे निधन झाले होते. अखेर ४.३० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचे निधन झाल्याची तक्रार माझ्याकडे आल्यास यासंदर्भात वरिष्ठ डॉक्टरांकडून या प्रकाराची चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर दोषींवर नक्कीच कारवाई करण्यात येईल.
डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -