घरमुंबईदुपारी या,पोलिसांची झोप मोडा !

दुपारी या,पोलिसांची झोप मोडा !

Subscribe

लोकांंना भेटण्याची वेळ दुपारी ३ ते ५, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचे आदेश

नागरिकांना मुंबईतील पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना भेटायचे असल्यास ते यापुढे दुपारी ३ ते ५ या वेळेत भेटतील, असा फलक आता प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयाबाहेर झळकू लागला आहे. मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी ही वेळ ठरवून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची झोप उडवली आहे. कारण आजवर या वेळेत बरेच पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्यातील विश्राम कक्षात झोप घेत असत. मात्र आयुक्तांच्या या निर्णयामुळे काही वरिष्ठ अधिकार्‍यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच संजय बर्वे यांनी मुंबई पोलीस दलात महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी सहपोलीस आयुक्तांना मुंबईतील पोलीस ठाण्यांना भेटी देऊन आढावा घेण्यास सांगितले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या भेटीच्या वेळात बदल केला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी मुंबई पोलीस दलाची धुरा हाती घेताच त्यांनी त्यांच्या पद्धतीने मुंबई पोलीस दलात बदल घडवण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील पोलीस ठाण्यांमध्ये काही नवीन बदल घडवण्यात येत आहेत. मुंबईतील पोलीस ठाण्यांमध्ये दररोज सहपोलीस आयुक्तांच्या भेटी सुरू झाल्या आहेत. त्या पाठोपाठ पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटण्याच्या वेळेतदेखील बदल केला आहे. मागील अनेक वर्षांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटण्याची वेळ सायंकाळी ५ ते ७ असल्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागत असे. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या ५ ते ७ या वेळेत यापूर्वी कधीही बदल झालेला नाही. दुपारी जेवणानंतर अनेक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे झोपा काढत असत. त्या वेळेस त्यांना भेटण्यासाठी गेल्यावर साहेब राउंडला गेले आहेत, असे उत्तर त्यांच्या ऑर्डर्लीकडून मिळत होते. यापुढे नागरिकांच्या भेटीसाठी दुपारी ३ ते ५ या वेळेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपलब्ध असतील, असे फलक दोन दिवसांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयाबाहेर झळकू लागले आहेत.

- Advertisement -

मुंबई पोलीस आयुक्तांच्या निर्णयामुळे वेळेत बदल करण्यात आला असून यापुढे वरिष्ठ निरीक्षक ५ ते ७ ऐवजी ३ते ५ या वेळेत नागरिकांना भेटून त्यांच्या समस्यांचे निवारण करतील, असे एका ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. पोलीस आयुक्तांनी वेळेत केलेल्या बदलाचे काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्वागत केले असले तरी काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे नाराज असलेल्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रात्रीची गस्त असल्यामुळे दुपारची थोडी झोप पाहिजे, तसेच बंदोबस्त असल्यावर पोलीस ठाण्यात उशिरा आल्यामुळे दुपारचे जेवण करता करता तीन ते साडेतीन वाजतात. त्यामुळे लोकांना भेटण्याची दुपारी ३ ते ५ ही वेळ खूप त्रासदायक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -