लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये बोगस ID Card धारकांचा सुळसुळाट; पोलिसांकडून धरपकड सुरू

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे लोकलने प्रवास करण्याची मुभा सरकारने अद्याप दिलेली नाही. असे असतानाही काही लोक बोगस ओळखपत्र तयार करून रेल्वेने सर्रास प्रवास करण्याचे धाडस करत आहेत. अशांवर रेल्वे पोलीस करडी नजर ठेवून आहेत. सीएसएमटी, भायखळा, दादर, घाटकोपर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, कसारा, टिटवाळा त्याचप्रमाणे हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल आणि चर्चगेट ते विरारपर्यंतच्या मार्गांवर रेल्वे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

लोकलने सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आलेली आहेत. मात्र सरकारी कर्मचारी, महापालिका कर्मचारी, हॉस्पिटलचे कर्मचारी असे अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. परंतु, काही जणांनी शक्कल लढवत मुंबई महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका यांचे बोगस आयकार्ड तसेच मुंबई शहरातील विविध रुग्णालयात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्र तयार करून रेल्वेने प्रवास करण्याचे धाडस केले.

दरम्यान, याबाबतची गुप्त माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्येक रेल्वे स्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची ओळख पत्र खरी आहेत की खोटी? याची कसून चौकशी सुरू केली. तसेच बोगस आयडी कार्डधारक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. बोगस आयडी कार्ड वापरणे हे बेकायदेशील असल्याचे माहीत असतानाही ते हे कार्ड दाखवून रेल्वे स्थानक परिसरात जाऊन लोकलने प्रवास करत आहेत.

हेही वाचा –

अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश न केल्याने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला मनसेचा दणका