फायर ब्रिगेडची पाच कोटींच्या अत्याधुनिक उपकरणांची खरेदी

दरवाज्यांचे लॅच लॉक, ग्रील तात्काळ तोडणे होणार शक्य

Mumbai
Fire Brigade

मुंबईत मागील अनेक वर्षांमध्ये आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढ होत आहे. परंतु इमारतींमधील घरांच्या दरवाजांचे लॅच लॉक उघडणे तसेच खिडक्यांच्या संरक्षक जाळ्या कापण्यासाठी होणार्‍या विलंबामुळे बर्‍याचदा आगीवर नियंत्रण मिळवण्यात उशीर होतो. परिणामी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही बाब लक्षात घेवून महापालिकेच्यावतीने स्प्रेडर, कटर, डोअर ब्रेकर, इलेक्ट्रोे हायड्रॉलिक पावरपॅक बॅकअप आणि बॅटरी ऑपरेटेड कॉम्बी टूल्स आदी विमोचन उपकरणांचे २५ संच खरेदी केले जात आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या या विमोचन संचामुळे तात्काळ घरांचे लॅच लॉक अथवा जाळ्या तोडून आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे.

मुंबईतील बहुतांशी इमारतींमध्ये घराच्या दरवाजांना लॅच लॉक लावण्यात येतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये लॅच लॉक असलेले दरवाजे उघडणे फार जिकरीचे होते. तसेच बहुतांशी इमारतींमध्ये खिडक्यांना संरक्षण स्टीलच्या जाळ्या बसवण्यात येतात. मात्र आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही जाळी कापून अडकलेल्या लोकांची सुटका करणेही जिकरीचे होत असते. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर उत्तुंग इमारती बांधलेल्या आहेत. या इमारतींमध्ये आग लागल्यास वरच्या मजल्यावर जावून दरवाजे तोडून आग विझवण्यासाठी हलके व सहज वाहून नेता येेण्यासारख्या विमोचन उपकरणांची आवश्यकता असते.

सध्या अग्निशमन दलामध्ये १७ विमोचन उपकरणे आहे. परंतु ही विमोचन उपकरणे जुनी तसेच कालबाह्य ठरली आहेत. त्यामुळे ही उपकरणे बदलून त्यांच्या जागी अत्याधुनिक पद्धतीच्या २५ उपकरणांच्या संचाची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घर पडलेल्या किंवा इतर दुघर्टनेत अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्याकरता या उपकरणांचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोनातून उपकरणांचे २५ संच खरेदी करण्यात येत असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केले. यासाठी ४.९० कोटी रुपये खर्च करून या संचाची खरेदी केली जाणार आहे.

उपकरणांच्या या संचात काय असेल
स्प्रेडर, कटर, डोअर ब्रेकर, इलेक्ट्रो हायड्रॉलिक पावरपॅक बॅकअप आणि बॅटरी ऑपरेटेड कॉम्बी टूल्स

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here