ठाण्यात झाडे लावण्यासाठी महापालिकेकडे जागाच नाही

विकासकामातील हजारो वृक्षांच्या पुनर्रोपणाचा प्रश्न

Mumbai
Thane municipal office
ठाणे महापालिका

वाहतुककोंडीवर पर्याय म्हणून सध्या ठाणे शहरात रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपूल बांधण्याचे कामे तसेच रस्ते जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र यामध्ये शहरातील पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. मुंब्रातील कौसा येथे जोडरस्त्याचे काम तसेच कोपरी येथील उड्डाणपुलाचे रुंदीकरण करताना त्या ठिकाणची हजारो झाडे तोडण्याचे प्रयोजन आहे. मात्र या झाडांचे पुनर्रोपन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी संघटनांनी केली आहे. त्यानुसार या झाडांचे पुनर्रोपन करण्यात येईल, असे ठामपाने जाहीर केले असले तरी याकरिता ठाण्यामध्ये जागाच मिळत नसल्याने हजारो वृक्षांचे पुनर्रोपन कुठे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकल्पामधून बाधित होणार्‍या 3 हजार 116 झाडांचे पुनर्रोपण करायचे की ती केवळ तोडून टाकायची याबाबत प्रशासनामध्ये अद्यापही एकमत होत नाही. कोपरी उड्डाणपूल रुंदीकरणाच्या कामात बाधित होणार्‍या 242 झाडांच्या मोबदल्यात 1200 झाडे लावण्यात येणार आहेत. याकरिता ठामपाकडून जागेचा शोध घेण्यात येत आहे. दोन्ही प्रकल्पांमध्ये मिळून अशी तब्बल तीन हजार 116 झाडांची कत्तल होणार आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे या झाडांच्या पुनर्रोपणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

एमएमआरडीएच्या वतीने कोपरी प्रकल्पातील सर्व झाडांचे तब्बल 1200 झाडांचे पुनर्रोपण करण्याचे प्रयोजन आहे. मात्र ही झाडे रस्त्यावर लावण्यासाठी जागाच नसल्याने अन्य कोणत्या ठिकाणी ही झाडे लावता येतील? यासाठी वृक्षप्राधिकरण विभागाच्या वतीने शहर विकास विभागाला पत्र देण्यात आले आहे. एमएमआरडीएच्या वतीने यासाठी ठाणे महापालिकेकडे 66 लाखांची अनामत रक्कमदेखील भरण्यात येणार आहे. मात्र जागाच मिळाली नाही तर पुनर्रोपण करणार कसे ,असा प्रश्न निर्माण झाला आहे.

झाडे तोडणे तसेच त्यांचे पुनर्रोपण करणे किंवा तोडणे अशी जाहिरात ठामपाच्या वतीने वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून यासंदर्भात हरकती, आक्षेप, सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले असून, या जाहिरातीच्या अनुषंगाने ठाण्यातील अनेक वृक्षप्रेमी आणि संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड-पुनर्रोपण करण्यात येणार असल्याने पर्यावरणाचा समतोल कशा पद्धतीने राखला जाणार आहे. असा सवाल ठामपाला करण्यात आला आहे. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे ही झाडांचे पुनर्रोपण करायचे कि ही झाडे केवळ तोडायची याबाबत वृक्षप्राधिकरण विभागामध्येच एकमत होत नसल्याने झाडांचे पुनर्रोपण करणे, तोडणे अशी जाहीरात करण्यात आली आहे. ही जागा वनविभागाच्या क्षेत्रातून जात असल्याने झाडांचे कशासाठी पुनर्रोपण करायचे असा युक्तीवाद करून पळवाट काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वृक्षप्रेमी संघटनांनी केला आहे.

प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे सरकारी पातळीवरून वृक्षारोपणाचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. पण या झाडांचे संगोपन व्हावे, त्यांना नुकसान पोहोचवणार्‍यांना शिक्षा व्हावी, अशी कुठलीही तरतूद सध्याच्या कायद्यांमध्ये नाही. त्यातच नवीन वृक्ष लागवडीकरिता ठाण्यात जागाच शिल्लक राहिली नाही. तेव्हा आता पर्यावरणाचा समतोल ठाणे महानगर पालिका कशा पद्धतीने राखणार हा गंभीर प्रश्न आहे.
– अरुण गुन्डे, राष्ट्रीय अध्यक्ष, एन्व्हॉयरमेन्ट पोल्युशन कन्ट्रोल अ‍ॅन्ड सेफ्टी फाऊन्डेशन