राणेंसाठी आघाडीत लाल कार्पेट

पवारांच्या कणकवली भेटीत नव्या राजकीय समिकरणाची नांदी

Mumbai
Sharad Pawar & Narayan Rane

भाजपबरोबरील शिवसेनेची युती होण्याची शक्यता दृष्टीक्षेपात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या घेतलेल्या भेटीत नव्या राजकीय समिकरणाची नांदी मानली जाऊ लागली आहे. भाजप शिवसेनेशी युती करणार असल्याने आगामी निवडणुकीत काँग्रेस आघाडीबरोबर राणेंनी यावे, असा प्रयत्न पवारांकडून आगामी काळात सुरू होईल, असे सांगितले जाते. सेनेबरोबर युती करणार्‍या कोणाबरोबर आपण राहणार नाही, या राणेंच्या याआधीच्या घोषणेचा फायदा घेत पवार कोकणात दोन्ही काँग्रेस बरोबर राणेंना बरोबर घेऊ पाहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे पवारांची राणेंच्या निवासी भेट मानली जात आहे. शिवसेना-भाजपला कोकणात तोंड देण्यासाठी राणेंच्या ताकदीचा फायदा घेण्याचा पवारांच्या भेटीचा हेतू असल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.

कोकणच्या कौटुंबिक दौर्‍यावर असताना शरद पवार यांनी सोमवारी अचानक नारायण राणे यांच्या कणकवली निवास्थानी भेट दिली. राणेंशिवाय त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या स्वाभीमानी पक्षाचे पदाधिकारी पवारांच्या या भेटीवेळी उपस्थित होते. ही भेट राजकीय नव्हती, असे पवार आणि राणेंच्या वतीने सांगण्यात आले असले तरी नव्याने बदलत्या राजकारणात राणे यांनी आघाडीत यावे, असा प्रयत्न पवारांनी सुरू केला आहे. कालच्या भेटीत पवारांनी मराठा आरक्षणाबाबत राणेंचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील राजकारणातल्या बदलत्या स्थितीत राणे यांनी काँग्रेस आघाडीत यावे, असा प्रयत्न पवारांनी केल्याचे जाणकार सांगतात. सेनेशी युती करणार्‍या कुठल्याही पक्षाला आपण मदत करणार नाही, असे राणे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. आता सत्ताधारी भाजपची शिवसेनेबरोबर युती होण्याची शक्यता दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राणे भेटीला अधिक महत्वा आले आहे.

बदलत्या परिस्थितीत आघाडीत येण्याचे निमंत्रण पवारांनी राणेंना दिल्याचे सांगण्यात आले. राणेंच्या मदतीमुळे कमकुवत बनलेल्या आघाडीला कोकणात विशेषत: कोकणात बस्तान निर्माण करता येईल, अशी अपेक्षा पवारांना आहे. यामुळेच त्यांनी राणेंना आघाडीत येण्याचे निमंत्रण दिल्याचे सांगण्यात आले. राणेंचे पुत्र नितेश यांना कोकणातून लोकसभेची आघाडीतून उमेदवारी देण्यात आल्यास ती जागा हमखास येईल, असा पवारांचा होरा आहे. या प्रस्तावाला काँग्रेसकडून कितपत सहकार्य मिळते, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी राष्ट्रीय स्तरावर एकेका जागेसाठी अडून न बसण्याच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या सूचनेचा आधार यासाठी घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here