घरमुंबईभिवंडीतील चिंचोटी-अंजूरफाटा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

भिवंडीतील चिंचोटी-अंजूरफाटा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

Subscribe

गाव संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश आल्याने चिंचोटी-कामण-अंजूरफाटा ते माणकोली या १४ किमी. लांबीच्या टोलधाड रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.

भिवंडी तालुक्यातील चिंचोटी-कामण-अंजूरफाटा ते माणकोली या १४ किमी. लांबीच्या टोलधाड रस्त्याची दूरवस्था झाल्याने वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. रोजच्या वाहन अपघातांमुळे नागरिकांचे हकनाक बळी जाऊन प्रवासी जखमी होण्याच्या घटना घडू लागल्या. त्यामुळे या रस्त्याच्या अखत्यारीतील अनेक गावांच्या नागरिकांनी ३१ ऑगस्ट रोजी खारबांव नाका येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून टोल वसुली बंद पाडली आहे. जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये, या भूमिकेवर संघर्ष समिती ठाम राहिली आहे. त्यामुळे या आंदोलनाने खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व मे. सुप्रीम वसई भिवंडी टोल वेज प्रा.लि.कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेतले. डिसेंबर अखेर रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता सचिन धात्रक यांनी टोल कंपनीला दिले आहेत.

गाव संघर्ष समितीच्या लढ्याला यश

तालुक्यातील चिंचोटी-कामण-अंजूरफाटा ते माणकोली या १४ किमी. लांबीचा रस्ता राज्य शासनाने बांधा-वापरा व हस्तांतरण (बीओटी) या तत्त्वावर सन २०१२ मध्ये खाजगी कंपनीकडे वर्ग केला आहे. मात्र या रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे मे.सुप्रीम वसई भिवंडी टोल वेज प्रा.लि.या खाजगी कंपनीने दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे रोजच अपघात घडत आहेत. या रस्त्याच्या परिसरातील कामण, पाये, खार्डी, पायगांव, मालोडी, खारबांव, वडूनवघर, डुंगे, कालवार, वडघर आदी गावच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी गाव संघर्ष समिती स्थापन करून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. खारबाव गावचे समाजसेवक ओम मुकादम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, विशाल पाटील, काँग्रेसचे अशोक पालकर, नितीन पाटील, उपसरपंच प्रशांत म्हात्रे, यतिष चौघुले, भरत वतारी, दैवत चौधरी, देवेंद्र वतारी, सुदाम पाटील, देवा पाटील, माजी सभापती प्रेमनाथ म्हात्रे आदींसह परिसरातील नागरिकांनी टोल नाका बंद पाडून रस्ता दुरुस्तीचा आग्रह धरला होता. अखेर संतप्त नागरिकांची तीव्र भावना लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी टोल नाका बंद ठेवून जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली केली जाणार नाही अशी लेखी हमी उपअभियंता सचिन धात्रक यांनी संघर्ष समितीला दिली असून प्रवासी व वाहन चालकांना त्रासदायक ठरणारे खड्डे भरण्याचे काम तात्काळ सुरु करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -