घरमुंबईपेंग्विनच्या देखभालीची जबाबदारी वादग्रस्त कंत्राटदारावर

पेंग्विनच्या देखभालीची जबाबदारी वादग्रस्त कंत्राटदारावर

Subscribe

भायखळा येथील राणीबागेत आणलेल्या पेंग्विनची देखभाल आतापर्यंत पालिकेकडून केली जात होती. मात्र, आता पेंग्विनची देखभाल खासगी कंत्राटदाराकडून करून घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पुढील तीन वर्षांसाठी तब्बल १२ कोटी रुपये कंत्राटदाराला दिले जाणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेने जुलै २०१६ मध्ये दक्षिण कोरियामधून आठ हंबोल्ड पेंग्विन आणले होते. पेंग्विन आणल्यावर दोनच महिन्यांत डोरी या मादी पेंग्विनचा मृत्यू झाला होता. भारतातील वातावरण पेंग्विनला मानवणार नाही या कारणाने अनेकांनी आक्षेप घेतला होता. “हाय वे” कन्स्ट्रक्शन या कंपनीने पेंग्विन किंवा प्राण्यांबाबत कोणताही अनुभव नसताना बोगस कागदपत्रे सादर करून पेंग्विन आणण्याचे कंत्राट मिळवले असल्याचे समोर आले होते. त्याविरोधात पालिका प्रशासन आणि लोकयुक्तांकडेही तक्रार करण्यात आली होती. याच वादग्रस्त कंत्राटदाराला राणीबागेत प्राण्यांचे पिंजरे बांधण्याचे कंत्राट देण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र मुंबईतील विरोधी पक्षातील नगरसेविकांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता.

राणीबागेत पिंजरे उभारण्याचे कंत्राट “हाय वे” ला बाद करून “स्काय वे” ला देण्यात आले. प्राणीसंग्रहालयात वाघ, सिंह, सांबर, हरीण, नील गाय, चार शिंगी हरीण, काळवीट, बार्किंग हरीण (भेकरा) तसेच पक्ष्यांचा पिंजरा बांधकाम करण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ६९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राणीबागेत पिंजरा बांधण्याचे कंत्राट स्काय वेला दिल्यावर आता पालिकेच्या उद्यान विभागाने पेंग्विनची देखभाल करण्यासाठी हायवे या खासगी कंत्राटदाराची नेमणूक केली. त्यासाठी पालिकेकडे पेंग्विनची हाताळणी व देखभालीची व्यवस्था करण्यासाठी तज्ञ कर्मचारी वर्ग नसल्याचे कारण देण्यात आले आहे. या कंपनीला पुढील तीन वर्षांचे देखभालीचे कंत्राट देण्यात येत आहे. या कालावधीत तब्बल ११ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कालावधीत कंपनीला पेंग्विन पक्ष्यांना खाण्यासाठी माशांचा पुरवठा, जीवरक्षक यंत्रणा, पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची सेवा, विद्युत यंत्रणा इत्यादी सेवा पुरवण्याची अट घालण्यात आली आहे.

- Advertisement -

पेंग्विन खातात १६ किलो मासे 

राणीबागेतील पेंग्विनला दरदिवशी ४५० ते ५०० ग्रॅम रावस, तारली, बोंबिल आणि ईल इत्यादी प्रकारचे मासे खायला दिले जातात. महिन्याला सात पेंग्विन १५ ते १६ किलोच्या मासळीचा फडशा पाडतात. पेंग्विनला देण्यात येणार्‍या माशामध्ये त्यांना आवडणारे बोंबील जास्त प्रमाणात असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -