घरमुंबईपरतीच्या पावसाचा दुग्ध व्यवसायावरही परिणाम

परतीच्या पावसाचा दुग्ध व्यवसायावरही परिणाम

Subscribe

परतीच्या पावसामुळे आता पालघर जिल्ह्यातील शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवू लागला आहे. पावसाने भात पिकापासून तयार होणारी पावळी भिजल्यामुळे आणि पाण्यामुळे पावळीला बुर्शी तयार होऊन काळी पडल्यामुळे गुरांना व म्हशींना खाण्यासाठी अयोग्य झाली असल्याने दूध उत्पादनात घट येत आहे. त्यामुळे पालघर तालुक्यातील दुग्ध व्यवसायिक आणि मुंबई, ठाणे व वसई येथील तबेलेधारक यांना नुकसानीला मोठा प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.

भाताच्या दाण्याचे नुकसान झाले तसाच फटका पावळी व गवताला ही बसला आहे. भिजलेल्या पावळीला बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने काळपट पडून दीर्घकाळ टिकण्यास अयोग्य ठरत आहे. गवत ओले असून जमिनीत पाण्याची मात्रा असल्याने हिरवेगार आहे. त्यामुळे पावळी आणि गवत खरेदी करण्यासाठी व्यापार्‍यांनी वखारी अथवा काटे टाकलेले नाहीत. अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. पावळी व गवत खरेदीच्या वखारी टाकण्यात न आल्याने शेतकरी आणखीनच संकटात सापडला असून त्यातच कोकण विभागीय आयुक्त यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी शेतकी संस्थांना व जिल्हा बँकांना पत्र काढून जबरदस्ती केली आहे.

- Advertisement -

त्यामुळे शेतकरी वर्ग पुर्णतः हताश होऊन हतबल झाला आहे. त्याच्यापुढे आत्महत्या करण्याचाच पर्याय त्याच्या पुढे उरला असून त्यांच्या व्यथा ना सरकार ऐकत ना निसर्ग. येणार्‍या अडीअडचणींना त्यांनाच सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांचा वाली कोणीच नाही असेच म्हणावे लागेल. गेल्यावर्षी गवत-पावळी खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी वखारी अथवा काटा टाकून खरेदीस सुरुवात केली होती. परंतु यावर्षी डिसेंबर उजाडला तरी गवत-पावळी खरेदीच्या वखारी अथवा काटे बसलेले नाहीत. अतिपावसामुळे पावळी बुरशीजन्य आणि काळी पडल्यामुळे व्यापार्‍यांनी खरेदी केल्यास योग्यदर मिळणार नाही.

ओली पावळी-गवत गाई-म्हशी खाण्यास पसंत करत नसल्याने त्याचा परिणाम दुधावर होत असून दुधाचे प्रमाण घटत आहे. ओल्या चार्‍यामुळे गाई-म्हशींच्या पचनक्रिये संदर्भातील पोटाचे विकार बळावतात. तर ओल्या गवत-पावळी खाल्ल्याने शेणावर परिणाम होऊन ते पातळ होते. दुधातील घट आणि ही माहिती स्थानिक दूध व्यवसायिकांनी दिली. दुग्धव्यवसायाकरता आवश्यक असलेला ओला आणि सुका चारा पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे गुजरात राज्यातील व मुंबई, वसई येथील दुग्ध व्यवसायिक पालघर तालुक्यात येऊन हा व्यवसाय करतात.

- Advertisement -

अल्पभूधारक, अत्याल्पभूधारक व बागायतदार या नोकरी-व्यवसाय करणारे सर्वच समाजघटक भात शेती करतात. याव्दारे मोठ्या प्रमाणात पावळी आणि गवताचा व्यवसाय केला जातो. या पेढ्यांना मशीनद्वारे प्रेस करून त्याचे बंडल बांधून तबेलेदारांना विक्री केले जातात. वसई, ठाणे व मुंबई येथील तबेलेदार सुक्या चार्‍याची मागणी करत असून ती पुरवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यातुन गवत व्यापार्‍यांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र यावर्षी गवत-पावळी खरेदीला सुरुवात न झाल्यामुळे दुग्ध व्यवसायावर आगामी काळात परिणाम होईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. असे दुग्ध व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दुभत्या जनावरांना ओला आणि सुका चारा आवश्यक असतो. फक्त ओला चारा खाल्ल्यास त्यांच्यातील पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊन दुधात घट होते. एक म्हैस प्रतिदिन 5 किलो सुका चारा म्हणून पावळी-गवत खाते. क्षमतेनुसार 12 ते 18 लिटर दूध देते. पालघर तालुक्यात सुका चारा वर्षभर मुबलक असतो. तो ठाणे, मुंबई व वसई येथील दुग्ध व्यवसायिक खरेदी करण्यास प्राधान्य देतात. गवत निर्यातीद्वारे शेतकर्‍यांना किमान 3 रुपये प्रति किलो पावळीला भाव मिळतो. एप्रिल ते मे या काळात गतवर्षी तो 15 रुपये किलो भाव झाला होता. भात पिकाचा एकूण उत्पादन खर्च कमी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तर स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -