घरमुंबईसबवेचा रस्ता गेला वाहून!

सबवेचा रस्ता गेला वाहून!

Subscribe

बदलापूर नगरपरिषदेचे दुर्लक्ष

बदलापुरात वारंवार होणार्‍या वाहनकोंडीमुळे पर्यायी रस्त्यांची व उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. या दृष्टीने प्रयत्नही होत आहेत. तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अस्तित्वात असलेले पर्यायी रस्ते वा सब-वे सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. परंतु बदलापूर पूर्व पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपुलाजवळील सब-वे चा रस्ता पुरात वाहून गेला असतानाही नगर परिषद प्रशासनाचे त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप भाजपा शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केला आहे.

बदलापुरात पूर्व- पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी वाहनांना उड्डाणपूल हा एकमेव मार्ग आहे. पूर्वी शहराच्या पूर्व -पश्चिम भागात ये- जा करण्यासाठी वाहन चालकांना बदलापूर रेल्वे स्टेशन फाटक, बेलवली रेल्वे फाटक व सध्याच्या उड्डाणपुलाजवळ असलेला सबवे असे तीन पर्याय होते. उड्डाणपुलाची उभारणी झाल्यानंतर ही दोन्ही रेल्वे फाटक बंद करण्यात आले. बेलवली येथील सब-वेमध्ये बारमाही पाणी असल्याने तोही नागरिकांसाठी गैरसोयीचा ठरतो. त्यामुळे बदलापूर पूर्व- पश्चिम भागात ये-जा करणार्‍या वाहनांच्या वाहतुकीची संपूर्ण भिस्त या एकमेव उड्डाणपुलावर आहे.

- Advertisement -

या उड्डाणपुलावर एखादे वाहन बंद पडल्यास काही मिनटात मोठ्या प्रमाणावर वाहनकोंडी होत असते. या पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्व पश्चिम भागाला जोडणारे बेलवली ते कात्रप व होप इंडिया ते बॅरेज रोड या दोन उड्डाणपूल उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अलीकडेच एमएमआरडीएने बेलवली ते कात्रप उड्डाणपुलाची उभारणी करण्याच्या कामाला मंजुरी दिली असून लवकरच बॅरेज रोड ते होप इंडिया उड्डाणपुलाच्या उभारणीच्याही हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बदलापूरकरांची वाहनकोंडीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

उड्डाणपूलाजवळील सब-वे काहीसा अरुंद असला तरी अनेक दुचाकी व रिक्षा चालक या रस्त्याचा वापर शहराच्या पूर्वपश्चिम भागात ये-जा करण्यासाठी करीत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाल्याने नागरिकांना या रस्त्याचा वापर करता येत नाही. सब-वे च्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने त्यांना उड्डाणपुलावरूनच पूर्व-पश्चिम भागात ये-जा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी हा रास्ता नव्याने तयार करण्यात यावा, अशी मागणी आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे स्थानिक नगरसेवक व भाजपा शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -