१ जानेवारीला सांताक्रूझ पादचारी पूल सुरू होणार

Mumbai
सांताक्रूझ पादचारी पूल

मुंबई महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे सांताक्रूझ रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचे काम रखडले. पश्चिम रेल्वेने पादचारी पूल कामासाठी वारंवार बीएमसीला पत्र पाठवून पादचारी पुलाला लागून असलेल्या बीएमसी कार्यालयाची जागा खाली करण्यास सांगितले होते. मात्र, बीएमसीने लवकर जागा खाली करून न दिल्यामुळे आतापर्यंत सांताक्रूझ पुलाचे काम रखडून पडले होते. मनसेकडून पश्चिम रेल्वेला ३१ डिसेंबरचे अल्टिमेटम देण्यात आले होते. त्यानंतर या पादचारी पुलाच्या कामाला गती आली आहे. हा पादचारी पूल आता १ जानेवारीपासून रेल्वे प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मागील कित्येक महिन्यांपासून सांताक्रूझ रेल्वे स्थानकांचा पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या पादचारी पुलाचे काम रखडून पडले होते. त्यामुळे सांताक्रूझ रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर गर्दी दिसून येत होती. येथे सुद्धा एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसून येत होती. यासंबंधी सर्वप्रथम दैनिक ‘आपलं महानगरने ’ ‘सांताक्रूझवर एल्फिन्स्टनचे सावट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुढाकार घेत अपूर्णावस्थेत असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी पश्चिम रेल्वेकडे केली होती. त्यानंतर सोबतच पश्चिम रेल्वेकडून ३१ डिसेंबरला काम पूर्ण होईल, असे लेखी आश्वासन लिहून घेतले होते.

बुधवारी रेल्वेचे अधिकारी आणि मनसे कार्यकर्त्यांनी सांताक्रूझ पुलाची पाहणी केली. मुंबई महानगरपालिकेच्या कामचुकारपणामुळे सांताक्रूझ रेल्वे स्थानकांच्या पादचारी पुलाचे काम रखडत जात होते. रेल्वेने ३ वेळा बीएमसीला पत्र पाठवून सुद्धा पादचारी पुलाजवळील जागा खाली करून दिली नाही. त्याला टाळे मारून ठेवल्याने हे काम रखडत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे, यांनी केला आहे.

मेरे महापौर कामचोर है…

पुलाचे काम रखडण्याला मुंबई महानगरपालिका जवबादार आहे. कारण सांताक्रूझ रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेने असलेल्या पादचारी पुलाला लागून बीएमसीच्या घनकचरा विभागाचे कार्यालय आहे. ते कार्यालय कित्येक वर्षांपासून बंद आहे. रेल्वेने या कार्यालयाची जागा खाली करून मागितली होती. मात्र, बीएमसीने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सांताक्रूझ रेल्वे स्थानकाचे काम रखडले होते. त्यामुळे ‘मेरे महापौर कामचोर है ’ अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी दिली.