Diwali : मुंबईत फटाक्यांचा आवाज कमी

मुंबईमध्ये दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फटाक्यांचा आवाजात घट झाली. यंदा मुंबईमध्ये फटाक्यांचा आवाज १०५.५ डेसिबल इतका नोंदवण्यात आला, असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आवाजाची पातळी ही कमी होती.

noice pollution

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यावर निर्बंध घालण्यात आल्याचा परिणाम शनिवारी नरकचतुर्दशीच्या दिवशी दिसून आला. मुंबईमध्ये दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फटाक्यांचा आवाजात घट झाली. यंदा मुंबईमध्ये फटाक्यांचा आवाज १०५.५ डेसिबल इतका नोंदवण्यात आला, असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आवाजाची पातळी ही कमी होती. मात्र रात्री १० वाजता फटाक्यांच्या आवाजात काही अंशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

आवाज फाऊंडेशनच्या माध्यमातून शनिवारी मुंबईतील फटाक्यांच्या आवाजाची पातळी मोजण्यात आली. यावेळी मुंबईतील अनेक भागांमध्ये फटाक्यांच्या आवाजाच्या पातळीत घट झाल्याचे पाहायला मिळाली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शांतता झोन म्हणून जाहीर केलेल्या शिवाजी पार्कामध्ये रात्री १० वाजताच्या सुमारास मोठ्या आवाजाचे फटाके वाजवण्यात आल्याचे दिसून आले. मात्र गेल्या काही वर्षापासून शिवाजी पार्कमधील फटाक्यांच्या आवाजाच्या पातळीत घट होत आहे. २०१७ मध्ये ११७.८ डेसिबल्स, २०१८ मध्ये ११४.१, २०१९ मध्ये ११२.३ आणि यंदा २०२० मध्ये १०५.५ डेसिबलची नोंद झाली आहे. या भागातील फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता हळूहळू कमी होत असल्याबद्दल आवाज फाऊंडेशनकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. शनिवारी मुंबईत फोडण्यात आलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या पातळीसंदर्भातील अहवाल आवाज फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुमैरा अब्दुलाली यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्राद्वारे पाठवला आहे.

आकाशात फोडण्यात येणारे फटाक्यांमुळे शहरातील आवाजाची पातळी मोजणे हे फारच अवघड काम आहे. अनेक खासगी सोसायट्यामंध्ये मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आले. बोरीवली, वरळी, दहिसर, ठाणे आणि जुहू, वर्सोवा या भागातून मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात येत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. त्याचप्रमाणे काही ठिकाणी रात्री १० वाजल्यानंतरही फटाके फोडत नियमाचे उल्लंघन करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फटाके कमी प्रमाणात फोडण्यात आले असून, यामध्येही फुलबाजे, भुईचक्र, अनार यांची संख्या अधिक असल्याचे दिसून असल्याचे अब्दुलाली यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटले आहे.

जगात आवाजाचे प्रदुषण करणार्‍या शहरांमध्ये मुंबईचा समावेश होतो. आवाजाचे प्रदुषण कमी करण्यासंदर्भात स्वीकारलेल्या आव्हानाबाबत राज्य सरकार, मुंबई पोलिस आणि मुंबईकरांचे धन्यवाद. गणपती, ईद-ए-मिलाद, दिवाळी यामध्ये होणारे आवाजाचे प्रदुषण कमी करण्यात सरकारने उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे. यातून धडा घेत सर्वाच्या चांगल्या आरोग्यासाठी नागरिकांनी भविष्यात इको-फ्रेंडली उत्सव साजरे करण्यावर भर द्यावा.
– सुमैरा अब्दुलाली, अध्यक्ष, आवाज फाऊंडेशन