मध्य रेल्वेच्या कर्मचार्‍याचा आवाजच बनली ओळख

Mumbai
G. S. Iyer

मुंबई:-नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा मेरी आवाज़ ही, पहचान है … कवी गुलजार यांच्या या ओळीप्रमाणेच मध्य रेल्वेच्या एका कर्मचार्‍याने आपल्या आवाजाने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना भुरळ घातली आहे. इतकंच नाही तर, त्याच्या आवाजामुळेच त्याला मध्य रेल्वेत एक विशेष ओळखसुद्धा आता मिळाली आहे. स्वच्छ भारत मोहिमेमध्ये प्रवाशांना सहभागी होण्यासाठी उद्घोषणा करण्यात येणारा हा आवाज याच कर्मचार्‍याचा आहे.

स्वच्छ भारत स्वच्छ रेल स्वच्छ हो परिसर अपना, राष्ट्रपति के स्वच्छ भारत का साकार करे हम सपना, आइए मध्य रेल्वे के स्वच्छता पखवाड़े से जुड़े और इस स्वछता अभियान को सफल बनाए, ही उद्घोषणा आपण लोकल प्रवासात मागील काही दिवसांपासून ऐकत आहोत. ही उद्घोषणा कोणत्याही तरी व्हॉईस ओव्हर देणार्‍या माणसाने केली असेल अशी जर तुम्ही कल्पना केली असेल तर तसे नक्कीच नाही. ही उद्घोषणा मध्य रेल्वेच्या एका कर्मचार्‍यानेच केली आहेत. जी. एस. अय्यर असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. 1992 मध्ये मध्य रेल्वेच्या सेवेत टेलिग्राफ सिग्नलर म्हणून अय्यर दाखल झाले. मात्र त्यांच्या कलेची ओळख मध्य रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना 2006 मध्ये झाली. तेव्हापासून मध्य रेल्वेच्या अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. तेव्हाच त्यांनी मिळालेल्या या संधीचे सोने केले. आपल्या रेल्वेच्या कामकाजाबरोबरच आपल्या आवाजाच्या जादूनेही सर्वांना अय्यर यांनी आपलेसे केले.

जी.एस. अय्यर यांनी नुकतेच 2 ऑक्टोबर 2018 रोजी महात्मा गांधींंच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधून एक छोटासा ऑडिओ रेकॉर्ड करून आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या व्हॉट्सअ‍ॅप वर पाठविला. त्याची दखल घेत रेल्वेने स्वच्छ भारत मोहिमेसाठी अय्यर यांना रेकॉर्डिंग करण्यास सांगण्यात आले. आता ही उद्घोषणा रेल्वेमध्ये रोज ऐकू येत आहे. विशेष म्हणजे ही उद्गोषणा स्वतः अय्यर यांनीच लिहिली आहेत. आज त्यांचा आवाज मध्य रेल्वेच्या 42 लाख प्रवाशांपर्यंत पोहचला आहे. त्याचा आनंद जी.एस अय्यर यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केला.

संधीचे केले सोने

मला लहानपणापासूनच हा छंद होता. मी रेल्वेची नोकरी करत असताना सुद्धा या छंदाला मी जोपासत होतो. मात्र जेव्हा मी तिकीट निरीक्षक होतो, तेव्हा मला 2006 मध्ये नाहूर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन समारोहाला जाण्याचा योग आला होता. तेव्हा मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आर.एस. विद्री यांनी मला सूत्रसंचालन करण्याची संधी दिली होती. त्या संधीचे मी सोने केले. त्यानंतर अनेक मध्य रेल्वेच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन सुद्धा मी केले. पण मध्य रेल्वेमध्ये उद्घोषणा देण्याची मात्र माझी पहिलीच वेळ आहे. कधी मी याबद्दल विचारसुद्धा नव्हता केला. मात्र मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे अशा शब्दांमध्ये जी.एस.अय्यर यांनी दैनिक आपलं महानगरकडे आपला आनंद व्यक्त केला.

आमच्या जनसंपर्क विभागातील अय्यर हे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहेत. आपल्या कामाबरोबर जी. एस. अय्यर हे रेल्वेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच अग्रणीय असतात. त्यांचा आवाज खूपच भारदस्त आहे. जेव्हा आम्ही रेल्वेमध्येही त्यांच्या आवाज ऐकतो तेव्हा खूप बरे वाटते. आमच्या संपूर्ण विभागासाठी अय्यर ही व्यक्ती गर्वाची बाब आहे.
ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here