घरमुंबईमित्राच्या बहिणीच्या अपघातामुळे संशोधनाला चालना

मित्राच्या बहिणीच्या अपघातामुळे संशोधनाला चालना

Subscribe

सलाईनवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विकसित केली प्रणाली

एखादी घटना आपले आयुष्य बदलून टाकते. याचा प्रत्यक्ष अनुभव नागपूरमधील सेंट विन्सेंट पल्लोट्टी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. मित्राच्या अपघात झालेल्या बहिणीला पाहण्यासाठी हे विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये गेले होते. हाताला लावलेल्या सलाईनमधील औषध संपल्यानंतरही जेलकोचा व्हॉल्व वेळेत बंद न केल्याने तिच्या हातातून सलाईनमध्ये रक्त येऊ लागले होते. तसेच तिच्या हातालाही प्रंचड सूज चढली, हे पाहून हे विद्यार्थी हेलावून गेले. त्यामुळे सलाईनमधील औषध संपल्यानंतर जेलकोचा व्हॉल्व आपोआप बंद होऊन रुग्णाला होणारा त्रास कसा कमी करता येईल यावर त्यांनी संशोधन केले. त्यातूनच त्यांनी ‘सलाईन मॉनिटरिंग अ‍ॅण्ड नोटिफिकेशन सिस्टीम यूसिंग इंटरनेट ऑफ थींग्स’ या प्रणालीचा शोध लावला. हॉस्पिटलमधील परिचारिका किंवा रुग्णाचे नातेवाईक त्याच्याजवळ नसतानाही सलाईनमधील औषध संपल्यानंतर ती आपोआप बंद होण्याचे तंत्र सेंट विन्सेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या नावावर नोंदले गेले आहे.

काही महिन्यांपूर्वी नागपूरमधील सेंट विन्सेंट कॉलेजमधील नुपूर कोहाडकर, मयुर इंगळे, सोनू दुपारे व सुसेन हाजी यांच्या एका मित्राच्या बहिणीचा अपघात झाला. त्यामुळे तिला पाहण्यासाठी हे विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी मित्राच्या बहिणीच्या शेजारी कोणीही नातेवाईक नसल्याने तसेच परिचारिकेच्या दुर्लक्षामुळे तिच्या हाताला लावलेली सलाईन वेळेत बंद करण्यात आली नाही. त्यामुळे सलाईनमधील औषध संपल्यानंतर हातातील रक्त सलाईनच्या नळीमध्ये आले. रक्त बाहेर आल्यामुळे तिला प्रचंड त्रास होऊन तिच्या हाताला प्रचंड सूज चढली. हे पाहून या विद्यार्थ्यांचे मन हेलावले. त्यामुळे यावर संशोधन करण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला. यासाठी विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलमधील अनेक डॉक्टर व वैद्यकीय विषयाशी संबंधितांशी चर्चा करून काही करता येईल का याची माहिती घेतली. रुग्णाला सलाईन लावण्यासाठी वापरण्यात येणार्‍या जेलकोवर कोणत्याही प्रकारे नियंत्रण ठेवता येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच अनेकदा सलाईन लावल्यानंतर परिचारिका अन्य कामामध्ये रुग्णाला सलाईन लावण्याची विसरण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नागपूरमधील या विद्यार्थ्यांना सलाईनवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‘सलाईन मॉनिटरिंग अ‍ॅण्ड नोटिफिकेशन सिस्टीम यूसिंग इंटरनेट ऑफ थींग्स’ ही यंत्रणा विकसित केली. यामध्ये सलाईनच्या बाटलीतील औषधावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांंनी दोन सेन्सर पॅनल विकसित केले. स्टँडला लावलेल्या दोन सलाईनच्या बाटल्यांना एकत्र जोडण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणारे थ्री वे स्टॉप कॉकचा वापर केला. कॉकवर त्यांनी सर्वो मोटर लावून सलाईनमधील औषधावर सेन्सरच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले.

- Advertisement -

एखाद्या रुग्णाला दोन सलाईनच्या बाटल्या लावायच्या असल्यास त्या एकाचवेळी स्टँडला लावायच्या. दोन्ही बाटल्या सर्वो मोटर लावलेल्या थ्री वे स्टॉप कॉकच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यात येतात. सलाईनच्या बाटल्या व सर्वो मोटर हे स्टँडला लावलेल्या दोन सेन्सर पॅनलला जोडले जाते. थ्री वे स्टॉप कॉकमधून एक नळी रुग्णाच्या हाताला लावलेल्या जेलकोला लावण्यात येते. सलाईनमधील औषध संपायला आल्यावर स्टँडला लावलेल्या सेन्सर पॅनलमधून त्याची माहिती परिचारिकेला मिळेल. लगेचच दुसरी सलाईन लावायची असल्यास पहिली सलाईन संपल्यावर सेन्सर पॅनलच्या मार्फत सर्वो मोटर फिरून कॉकचा व्हॉल्व 90 डिग्रीमध्ये फिरून पहिली सलाईन बंद होऊन दुसरी सलाईन सुरू होईल. सलाईनमधील औषध संपण्याची सूचना परिचारिकेला मिळाल्यानंतरही त्या रुग्णाजवळ न आल्यास सेन्सर पॅनलमार्फत सर्वो मोटरच्या माध्यमातून पुन्हा कॉक काही डिग्री अंशामध्ये फिरवून पूर्णपणे व्हॉल्व बंद करेल. काही रुग्णांना ठरावीक वेळेनंतर सलाईन लावण्यात येते. त्यामुळे एखाद्या रुग्णाला एकच सलाईनची बाटली लावल्यावरही सेन्सर पॅनलच्या माध्यमातून व्हॉल्व बंद होण्याची यंत्रणाही विकसित केली आहे. त्यामुळे सलाईन संपल्यानंतर परिचारिका किंवा रुग्णाचे नातेवाईक त्याच्याजवळ नसले किंवा रुग्णाचेही लक्ष नसल्यास शरीरातील बाहेर येणार्‍या रक्तामुळे होणार्‍या त्रासापासून सुटका होणार असल्याची माहिती सेंट विन्सेंट कॉलेजचा विद्यार्थी मयूर इंगळे याने दिली. प्रो. मनीष कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही प्रणाली विकसित केली आहे. आयआयटी मुंबईत झालेल्या ‘ई-यंत्रा’ या स्पर्धेत हे संशोधन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

मोबाईल अ‍ॅपवर मिळणार माहिती
सलाईनमधील औषध खालच्या पातळीवर आल्यावर त्याची माहिती हॉस्पिटलमधील परिचारिकांना व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी एक मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. सलाईनमधील औषध संपल्याची माहिती सेन्सर पॅनलच्या माध्यमातून तातडीने परिचारिकेला मोबाईल अ‍ॅपवर मिळणार आहे. हे अ‍ॅप व सलाईन स्टँडला असलेल्या सेन्सर पॅनलला हॉस्पिटलमधील व्हायफायने जोडता येणार आहे, अशी माहिती सुसेन हाजी हिने दिली.

- Advertisement -

अवघ्या दीड हजारात यंत्र
रुग्णाला होणारा त्रास कमी करण्यासाठी सेंट विन्सेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ‘सलाईन मॉनिटरींग अ‍ॅण्ड नोटिफिकेशन सिस्टीम यूसिंग इंटरनेट ऑफ थींग्स’ प्रणालीला फक्त दीड हजार इतका खर्च विद्यार्थ्यांना आला आहे. ही प्रणाली विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणार्‍या उपकरणांचाच अधिक वापर करण्यात आल्याचे नुपूर कोहाडकर हिने सांगितले.

रुग्णांची माहिती स्क्रीनवर
हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णाला शोधताना अनेकदा नातेवाईकांची तारांबळ होत असते. त्यामुळे नातेवाईकांचा त्रास कमी व्हावा यासाठी या प्रणालीमध्ये अधिक संशोधन करून रुग्ण कोठे आहे याची माहिती हॉस्पिटलच्या स्वागत कक्षासमोरील स्क्रीनवर दाखवण्याबाबतही संशोधन करण्यात येणार आहे. तसेच स्क्रीनवर रुग्णाला लावलेल्या सलाईनची माहितीही दिसणार असल्याने प्रतीक्षा कक्षामध्ये असलेल्या नातेवाईकांनाही त्याबाबत सहज माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सोनू दुपारे या विद्यार्थ्याने दिली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -