घरमुंबईमुंबई विद्यापीठाला राष्ट्रध्वजाचा विसर

मुंबई विद्यापीठाला राष्ट्रध्वजाचा विसर

Subscribe

ध्वजस्तंभावर 10 महिन्यांपासून तिरंगा फडकलाच नाही

मुंबई विद्यापीठात शिकणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे आणि देशातील विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचे वेगळे स्थान मिळावे यासाठी दोन वर्षांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने कलिना कॅम्पसमध्ये तब्बल 150 फूट उंच ध्वजस्तंभ उभारला होता. 150 फूट उंच ध्वजस्तंभ उभारणारे मुंबई विद्यापीठ देशातील पहिले विद्यापीठ ठरले होते. मात्र 10 महिन्यांपासून या ध्वजस्तंभावर एकदाही तिरंगा फडकलेलाच नाही.देशात नावलौकिक मिळवण्यासाठी उभारलेल्या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकत नसल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ध्वज फडकत नसल्याने हा ध्वजस्तंभ उभारला तरी कशाला? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाला 160 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 18 जुलै 2016 मध्ये कलिना कॅम्पसमध्ये 150 फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला. त्यावर 30 बाय 50 फूट अशा भव्य आकाराचा तिरंगा 24 तास सुरुवातीचे काही महिने फडकत होता. परंतु 10 महिन्यांपासून या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकलाच नसल्याचे उघडकीस आले आहे.मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर विद्यापीठाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या ध्वजस्तंभाबाबत मात्र प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

देशातील विद्यापीठांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख व नावलौकीक मिळवण्यासाठी उभारलेल्या सर्वात उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवला न जाणे ही शरमेची बाब आहे.सुरुवातीचा काळ वगळता 10 महिन्यांपासून एकदाही ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकल्याचे दिसलेले नाही, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई विद्यापीठाचे अध्यक्ष किरण सावंत यांनी दिली. यासंदर्भात मुंबई विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक वाढावा यासाठी उभारलेल्या 150 फूट ध्वजस्तंभावर 10 महिन्यांपासून राष्ट्रध्वज फडकला न जाणे ही नामुष्कीची गोष्ट आहे. राष्ट्रध्वजाकडेच विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष नसेल तर ही गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष किरण सावंत यांनी दिली.

राष्ट्रध्वजाप्रती विद्यापीठाचे असलेले दुर्लक्ष ही चिंतेची बाब आहे. एखाद्या कार्यक्रमावेळीच का ध्वज फडकवला जातो? ध्वज वार्‍यामुळे फाटतो असे कारण काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने दिले होते. परंतु या बाबीचा विचार ध्वजस्तंभ उभारताना करणे अपेक्षित होते. फक्त प्रसिद्धीसाठी विद्यापीठाने हा स्तंभ उभारला होता का? याचा विद्यापीठाने खुलासा करावा अन्यथा मनसे आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. येत्या सिनेटमध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित करणार आहोत- सुधाकर तांबोळी, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -