घरमुंबईस्वातंत्र्याचे मोल...!

स्वातंत्र्याचे मोल…!

Subscribe

भ्रष्टाचार, बेरोजगारी हे सर्वाधिक महत्त्वाचे प्रश्न आहेत. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा या क्षेत्रात आपण आजही प्रचंड मागे आहोत. स्वतः धान्य दुकानांसमोरील गर्दी आजही कमी होत नाही. ‘मागास’ होण्यासाठी जातीजातीत संघर्ष तीव्र आहे. म्हणून ‘भारत माता की जय’ म्हणत असताना भारतमातेने मला सात दशकात काय दिले? असा प्रश्न विचारला तर बिघडतो कुठे? ‘ये आझादी झुठी है, देश की जनता भूकी है’ ही १६ ऑगस्ट १९४७ साली मुंबईमध्ये निघालेल्या मोर्चाची घोषणा आजही देशात दिली जाते. घोषणा देणारे देशद्रोही ठरविले म्हणजे परिस्थिती बदलेल काय?

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे आपण जातो आहोत. ही अनन्यसाधारण घटना. परंतु या घटनेचे ‘मोल’ स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या व शाळेत गोळ्या, बिस्कीट मिळतात म्हणून स्वातंत्र्य दिनी झेंड्याला सलामी देत मोठे झालेल्या आजच्या पिढीला कितपत आहे? हा खरा प्रश्नच आहे! कारण राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती आणि देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावणारे आजचे उन्मादी वातावरण पाहता मन व्यथित होते. राष्ट्रगीत, वंदे मातरम्, गोरक्षण वगैरे यांविषयी सार्वत्रिक भ्रम पैदा करून कोण देशभक्त? व कोण देशद्रोही? याचे प्रमाणपत्र वाटप करणार्‍या या तथाकथित देशभक्त झुंडींना स्वतंत्र भारतासमोर आज नेमके कोणते प्रश्न ‘आ’वासून उभे आहेत, याचे भान आले तर बरे होईल. भारत-पाक क्रिकेट सामना किंवा स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिन साजरा करताना आम्हाला देशप्रेमाचे भरते येते. देशभक्तीपर चित्रपट पाहून राष्ट्रभक्तीचा जल्लोष साजरा करणार्‍या या बेगडी राष्ट्रवाद्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास हा मात्र ओझं वाटतो?

पारतंत्र्याच्या जखमा अंगाखांद्यावर घेऊन स्वतंत्र भारताच्या उभारणीत अतुलनीय योगदान देणार्‍या सामान्य माणसांपासून, कष्टकरी, उद्योजक, शेतकरी, सैनिक, वैज्ञानिक ते राजकीय नेत्यांपर्यंत पहिल्या तीन दशकांत या माणसांनी आपल्या श्रमाच्या बळावर दूरदृष्टीने या देशाची उभारणी केली. स्वातंत्र्य देताना इंग्रजांनी वारशात आमच्या हातात काय दिले होते. पुढील काळात आम्ही काय प्रगती केली? याचे मनाशी चिंतन केले म्हणजे गत सात दशकात काय झाले? या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळते, परंतु त्यासाठी गरज आहे, स्वतःची नजर धुवून घेण्याची. विकसित राष्ट्रांशी स्पर्धा करण्याची हिंमत आपला देश आज ठेवू शकतो. त्याचे कारण भौतिक प्रगती व राष्ट्रीय एकात्मता हेच आहे.‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्ताँ हमारा’ हे गुणगुण्यापलिकडे त्यातील मर्म आम्ही कधी लक्षात घेणार आहोत की नाही?’ ‘विविधतेतील एकते’ मुळे आम्ही सार्‍या जगापेक्षा वेगळे आहोत, हीच आमची ‘शक्ती’आहे. हे या भंपक राष्ट्रभक्तांना कधी कळणार? वस्तुस्थिती दुर्लक्षून निव्वळ शब्दांचे बुडबुडे सोडून किंवा उबग आणणार्‍या जाहिराती करून देश उभा राहत नसतो. हे बहुदा ‘राष्ट्र’ उभारणी करणार्‍या पूर्वीच्या नेत्यांना चांगलेच ज्ञात असावे. म्हणून त्यांनी या देशाची बांधणी स्वःप्रतिमेचा बागूलबुवा उभा न करता संवैधानिक मूल्यांना प्रमाण मानून केली.

- Advertisement -

फ्रेंच राज्यक्रांतीने प्रसवलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांनी संवैधानिक मार्गाने भारतीय समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणला. संविधानामुळे ‘एक व्यक्ती एक मूल्य’ ही नवी व्यवस्था आकाराला आली. ‘स्वातंत्र्य’ या मूल्यामुळे व्यक्ती जीवनाला नवा अर्थ प्राप्त झाला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्याय इत्यादींची रुजवणूक करण्याची जबाबदारी संविधानाने शासनाच्या खांद्यावर दिली. नेहरुंनी ‘लोकशाही समाजवादा’च्या माध्यमातून समाजातील सामाजिक, आर्थिक विषमता कमी करीत कल्याणकारी राज्याचे स्वप्न पाहिले. समाजाच्या स्वातंत्र्याकडून अपेक्षा उंचावल्या. कल्याणकारी राज्याचे स्वप्न साकार करताना व्यक्तीला प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता व देशाची भौतिक प्रगती या त्रिसुत्रीनेच देशाची बांधणी मजबूत केली गेली. परंतु संवैधानिक नव्या मूल्यांची वाहक देशातील पारंपरिक समाजसंरचना राहिल्यामुळे सामाजिक, आर्थिक विषमतेची दरी कमी करण्याचा अपेक्षित परिणाम तीस-चाळीस वर्षांनंतरही साध्य झाला नाही. ‘गरिबी हटाव’च्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात गरिबी कमी झाली नाही. उलट आणीबाणी लावून स्वातंत्र्याची गळचेपी केली गेली. म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय यावर श्रद्धा असणारी माणसं पुन्हा अगतिकतेतून स्वातंत्र्य कुणा गाढवीचे नाव आहे? असा रोखठोक प्रश्न विचारु लागले.”जेलखान्यातले आपण कैदी आहोत असं वाटायला लावणारं स्वातंत्र्य अखेर कुणाच्या बाजूनं? “फ. मुं च्या शब्दातून व्यक्त झालेला हा सामाजिक आशय स्वातंत्र्याच्या चाळीसीतीलच आहे. हेही खरे!

दुसर्‍या पर्वात देशात मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे जोरात वाहू लागले. ‘खाऊजा’ आले. आम्ही ‘ग्लोबल’ झालो.

- Advertisement -

परिवर्तनाला नवा आयाम प्राप्त झाला. उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून नवनवी क्षेत्र आकाराला आली. वैज्ञानिक प्रगती, संगणक, इंटरनेट, माहिती तंत्रज्ञान यामुळे नव्या भारताचे स्वप्न रंगवले गेले. प्रत्यक्षात मात्र मूठभर भांडवलदारांच्या हातात साधन संपत्तीची मालकी व सर्व सत्तासूत्रे जाण्याची प्रक्रिया शिस्तबद्धपणे सुरू झाली. माणसांचे यंत्रात रुपांतर करणारी नवी बाजारु व्यवस्था व्यक्तीला ‘ग्राहक’ म्हणून पाहू लागली. सार्वजनिक सेवा आणि सरकारी उपक्रम डबघाईला येऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भांडवलदारी गुंतवणूक वाढीस लागली. सरकारची म्हणजेच पर्यायाने जनतेची अनेक संसाधनावरील मालकी संपुष्टात येऊ लागली. मूठभर भांडवलदारांच्या विळख्यात सर्व देश जातो की काय? अशी भीती निर्माण झाली. भांडवली शक्तींचे लाखो करोडोंचे कर्ज सरकारकडून बिनबोभाट माफ केले जावू लागले. दुसरीकडे महाराष्ट्रात महिन्याला शेकडो शेतकरी आत्महत्या करत आहेत. काय आहे? जानेवारी ते जून हा आकडा मोठा आहे. शेतकरी आपले जीवन संपवतात; पण स्वतंत्र भारताच्या राज्यकर्त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. पासष्ट टक्के जनता आजही दुर्बल असेल तर आम्ही कोणत्या ‘न्यू इंडिया’वर विश्वास ठेवावा. आर्थिक विषमतेसह सामाजिक विषमताही टोकदार आहे. कोणी काय खावं? काय प्यावं? काय अंगात घालावं? हे मूलतत्ववादी ठरवीत आहेत.

नक्षलवाद, दहशतवादाने थैमान घातले आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी हे सर्वाधिक महत्त्वाचे प्रश्न आहेत. परंतु कोणी गंभीर नाही. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा या क्षेत्रातही आपण आजही प्रचंड मागे आहोत. बीपीएल धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. स्वतः धान्य दुकानांसमोरील गर्दी आजही कमी होत नाही. ‘मागास’ होण्यासाठी जातीजातीत संघर्ष तीव्र आहे. म्हणून ‘भारत माता की जय’ म्हणत असताना भारतमातेने मला सात दशकात काय दिले? असा प्रश्न विचारला तर बिघडतो कुठे? ‘ये आझादी झुठी है, देश की जनता भूकी है’ ही १६ऑगस्ट १९४७ साली मुंबईमध्ये निघालेल्या मोर्चाची घोषणा आजही देशात दिली जाते. घोषणा देणारे देशद्रोही ठरविले म्हणजे परिस्थिती बदलेल काय?

प्रांत, धर्म, जात, भाषा हे आमच्या लोकशाही समोरील आव्हाने आजही जैसे थे आहेत. उलट या विषयीच्या टोकदार अस्मिता स्वातंत्र्याचा गळा घोटू पाहत आहेत.

‘‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आय बहीण आजही विटंबली जाते हाटाहाटातून…मवाल्यांसारखे माजलेले उन्मत निरो, आजही मेणबत्ती सारखी जाळतात माणसं चौकचौकातून…कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टाहास केलाच तर आजही फिरवला जातो नांगर घरादारावरून..चिंदकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरानगरातून…’’(नामदेव ढसाळ) नेमकं काय बदलले? हे आजचे वास्तव नाही काय? सर्व काही अस्वस्थ करणारे आहे. भयावह सामाजिक, आर्थिक विषमता पोटात घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वल्गना सुरू झाल्या आहेत. मात्र ‘स्वातंत्र्य कसे /दहशती खाली/वाहते पखाली /सतेच्याच’(फ.मुं) ही अवस्था बदलली तरच जनता विश्वास टाकेल. म्हणून येणार्‍या काळात व्यक्ती जीवनातील ‘स्वातंत्र्य’ या मूल्याला नवा आयाम प्राप्त व्हावा व संवैधानिक मूल्यांवर निष्ठा असणारा विवेकाधिष्ठित ‘नवा भारत’ आकाराला यावा..इतकीच अपेक्षा आपण करुयात…!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -