घरमुंबईलढवय्ये जॉर्ज

लढवय्ये जॉर्ज

Subscribe

विशेष संपादकीय

‘‘मग मी काय करावं असं वाटतं? राजकारणातून निवृत्त व्हावं? मधू लिमयेसारखं फक्त लिखाण करावं. आपल्याकडे येणार्‍या नेत्यांना कार्यकर्त्यांना सल्ले द्यावेत? नानाजी देशमुख किंवा एखाद्या सर्वोदयी नेत्यासारखं एखादा आश्रम काढून बसावं? माझा हा पिंड नाही.आतापर्यंतच्या आयुष्यात मी नेहमी ट्रेड युनियनचे असो, पक्षाचे असो, संसदीय असो, प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन लोकांबरोबर काम केलंय. जनतेला बरोबर घेऊन सर्व संघर्ष केलेत. त्यातून अनेक संघटना उभ्या राहिल्या. संपूर्ण आयुष्यात मी लोकशाहीवर विश्वास ठेवला. लढायांत पराजय महत्त्वाचा नाही तर संघर्ष महत्त्वाचा असतो, असे मी मानत आलो.’’ आपल्या साथींसोबत मनोगत व्यक्त करताना जॉर्ज फर्नांडिस यांनी काढलेले हे उद्गार आहेत. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्यातील लढवय्या नेता कायम स्मरणात राहील. मग तो मैदानातला लढा असो किंवा संसदेतला किंवा मालकांविरोधातला असो. तसेच भाजपबरोबर सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर समाजवादी नेत्यांकडून झालेली टीका असो…या नेत्याच्या आयुष्यालाच संघर्ष पूजला होता. पण, म्हणून त्यांनी कधी माघार घेतली नाही. आपल्याला जे योग्य वाटले तेच शेवटपर्यंत केले. भयानक म्हणजे मृत्यूशीही त्यांना संघर्ष करावा लागला. गेल्या एक दशकात त्यांचे शरीर जिवंत होते, पण मेंदू निद्रावस्थेत गेला होता. जिवंत असून मरणयातना भोगल्या त्यांनी. हे भोग त्यांना सहन करावे लागले ते लोकांच्या हक्कासाठी लढत असताना पोलिसांकडून झालेल्या जबर मारहाणीमुळे. आधी देशातील सर्वात मोठा रेल्वे संप पुकारल्यानंतर रेल्वे रुळावर झोपलेल्या जॉर्ज यांना पोलिसांनी गुरासारखे मारले आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे आणीबाणीविरोधी चळवळीत इंदिरा गांधी यांच्या विरोधात देशात सर्वात प्रखर विरोध केला म्हणून त्यांना भोगावी लागलेली शिक्षा. इंदिरा गांधी यांनी त्यांना ठार मारायचे बाकी ठेवले होते. जॉर्ज जणू देशद्रोही होते, अशा रितीने त्यांना साखळदंडात बांधून त्यांचे तुरुंगात प्रचंड हालहाल करण्यात आले. ते जिवंत कसे राहिले, हेच आश्चर्य होते. त्यांच्या जागी दुसरे कोण असते तर त्यावेळीच त्यांनी तुरुंगात शेवटचा श्वास घेतला असता. पण हाडापेराने मजबूत असलेल्या जॉर्ज यांनी तो मार पचवला तो केवळ शारीरिक क्षमतेच्या जोरावर नव्हे तर असिम अशा इच्छाशक्तीच्या जोरावर. आपल्याला लोकांसाठी अजून खूप काम करायचे आहे म्हणून ते आणीबाणीनंतर तीन दशके काँग्रेस राजवटीला सतत धक्के देत समर्थपणे उभे राहिले. बसलेला मार त्यांच्या शरीराने इतक्या वर्षात सहन केला, पण 2009 नंतर त्यांचा मेंदू हळूहळू काम करेनासा झाला आणि त्यानंतर त्यांना स्मृतीभ्रंश झाला. शरीर जिवंत, पण मेंदू मेलेला…असे गलितगात्र जॉर्ज पाहताना अंगावर काटा येत असे. त्यांची भाषणे ऐकलेल्या, त्यांच्याबरोबर काम केलेल्या आणि आधी एक माणूस म्हणून त्यांना पाहिलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. आज ते हे जग सोडून गेले तरी पण त्यांचे अख्खे आयुष्य हे एका लढवय्या सैनिकाच्या आयुष्याच्या उघड्या पुस्तकासारखे आहे. धर्माच्या बेडीत अडकण्यापेक्षा जीवनात बरेच काही करता येईल, या निर्धाराने कर्नाटकातील आपल्या घरातून पळून मुंबईत आलेल्या जॉर्ज यांनी घरचा आणि दारचा कुठला राजकीय आणि श्रीमंती वारसा नसताना देशाच्या संरक्षण मंत्रीपदापर्यंत झेप घेतली, ती आपल्या अथक परिश्रम, अभ्यासू वृत्ती, समाजवादी विचारांवरील अगाध निष्ठा, सामान्य माणसांप्रती असलेली आपुलकी आणि सामान्य राहणीच्या जोरावर. मुंबईत कुठलाही आसरा नसताना रस्त्यावर पथारी पसरून जगणार्‍या जॉर्ज यांच्यात कुशल संघटक जन्मजात होता. त्यामुळे ते कामगार युनियन तसेच राजकारणात आले नसते तरी ज्या कुठल्या क्षेत्रात गेले असते तेथे त्यांनी आपल्या असामान्य कौशल्याच्या जोरावर नाव रोशन केले असते. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, नाथ पै यांचा आदर्श आणि मधू लिमये, मधू दंडवते या साथींच्या साथीने तर कधी एकहाती काँग्रेसला संसदेत जेरीस आणले. संसदचे काम आटोपल्या-नंतर ग्रंथालयात जाऊन अभ्यास करण्याचे व्रत त्यांनी कधी सोडले नाही. यामुळेच ते सत्ताधार्‍यांना कायम प्रश्न विचारते झाले. विशेष म्हणजे दौरे, सभा, आंदोलने आणि कितीही व्यस्त दिवस गेला तरी रात्री दोन एक तास वाचन त्यांनी थांबवले नाही. याच अभ्यासू गुणांमुळे ते नेत्याबरोबर प्रश्नकर्ते झाले. लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकले. ही वाचा फोडताना त्यांनी लोकशाहीत एकाच पक्षाकडे सत्ता नको म्हणून आणि ती असली की त्याचे डबके होते म्हणून देशात बिगरकाँग्रेसचे सरकार येण्याची मोहीम सुरू केली. याचा अर्थ त्यांना काँग्रेस पक्ष संपावा असे वाटत नव्हते. यासाठी त्यांनी भाजपला पाठिंबा देत एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. यामुळे त्यांना समाजवादी साथींची कडवट टीका सहन करावी लागली. साथ सोडावी लागली; पण, ते विचलित झाले नाहीत. 2014 साली बिगरकाँग्रेस राजवट म्हणजे नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर येण्याची बिजे जॉर्ज यांनी पेरली होती. आज जॉर्ज आपल्यात नाहीत, पण आवाज कुणाचा… असा जनमानसातून आवाज घुमेल तेव्हा जॉर्ज साक्षात उभे असतील… असा लढवय्या साथी होणे नाही!

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -