बुद्ध पौर्णिमा: बुद्धाचे हे विचार जीवनाला कलाटणी देणारे

संपूर्ण जगभरात शांततेचा संदेश पोहोचवणाऱ्या बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्धांची जयंती आज साजरी होत आहे. अहिंसेच्या मार्गाचा त्याग करून शांततेचा मार्ग स्विकारा, असा बहुमूल्य विचार गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला दिला.

Mumbai
birth anniversary of Gautam Buddha
भगवान गौतम बुद्धांची जयंती

बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण अर्थात बुद्ध जयंती. ज्याला बुद्ध पौर्णिमा देखील म्हटले जाते. भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस तीन कारणांसाठी विशेष आहे. ते म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले. तसेच दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्गही याच दिवशी गौतम बुद्धांना सापडला. भगवान गौतम बुद्धांचा इतिहासातील त्या सर्वात महान व्यक्तींमध्ये सहभाग होतो, ज्यांनी बौद्ध धर्माच्या रूपात मानवतेला एक अमूल्य भेट दिली आहे. त्यांनी स्थापना केलेल्या धर्माचे आज ४० करोडहून अधिक लोक अनुकरण करत आहेत.

भगवान गौतम बुद्धांच्या काही अमूल्य विचार जाणून घेवूयात…

 • हा संसार दुःखाने भरलेला आहे. या दुःखांचे कारण आपल्या इच्छा आहेत. इच्छांवर नियंत्रण मिळविल्याने दुःखांचा नाश होवू शकतो.
 • जर तुमची एक इच्छा पूर्ण होत असेल तर दुसरी इच्छा लगेच जन्म घेते.
 • राग धरून ठेवणे, म्हणजे, कोणा दुसऱ्यावर फेकण्यासाठी गरम कोळसा हातात धरून ठेवण्याप्रमाणेच आहे. यात केवळ तुम्हीच जळता. यात केवळ तुमचेच नुकसान होते.
 • सत्याच्या मार्गावर चालत असता कोणताही व्यक्ती दोनच चुका करू शकतो – पूर्ण रस्ता निश्चित न करणे किंवा सुरूवातच न करणे.
 • चांगले आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. विश्वास सर्वात सुंदर संबंध असून संतोष सर्वात मोठे धन आहे.
 • आपले कार्य पूर्ण करण्यासाठी कधीही दुसऱ्यावर विसंबून राहू नका.
 • भूतकाळाकडे लक्ष देवू नका, भविष्याचा विचार करू नका, आपल्या मनाला वर्तमानकाळावर केंद्रीत करा.
 • कधीही कोणाच्या दुःखाचे कारण बनू नये.
 • जो व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकतो, तो व्यक्ती कधीच दुःखी राहत नाही.
 • जो व्यक्ती त्याच्यातील कमतरता दाखवणाऱ्याला खजिना दाखवणारा समजेल आणि चांगल्या संगतीत राहिल. त्या व्यक्तीचे नेहमीच चांगले होते.
 • आपल्याकडून झालेल्या चुकांची शिक्षा जरी आपल्याला लगेच मिळत नसली तरी वेळेनुसार कधी ना कधी शिक्षा नक्कीच मिळते.
 • हजार पोकळ शब्दांपेक्षा तो एकच शब्द चांगला ठरतो ज्यामुळे शांती मिळते.
 • मी कधीच काय करण्यात आले आहे हे पाहत नाही, तर मी फक्त एवढेच पाहतो की, काय करणे बाकी आहे.
 • शरीर निरोगी ठेवणे आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. नाहीतर आपण आपल्या मनाला शक्तीशाली बनवू शकत नाही.
 • शांतताप्रिय लोक आनंदात जीवन जगतात. त्यांच्यावर जय-पराजयाचा कोणताच प्रभाव पडत नाही.
 • जी व्यक्ती बोलताना आणि काम करताना शांत राहते, ती व्यक्ती दुःख, त्रासांपासून दूर राहते.
 • ज्याप्रकारे वादळ पर्वताला हलवू शकत नाही, त्याप्रकारेच प्रशंसा तसेच निंदा महान व्यक्तीवर परिणाम करू शकत नाही.
 • एक हजार वर्षांपर्यंत ध्यानाशिवाय साधना करण्यापेक्षा जीवनात एक दिवस समजूतदारपणे जगणे उत्तम ठरते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here