मराठा विद्यार्थ्यांना शुल्क सवलतीचा विचार; अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्यासह विविध पर्याय उपलब्ध करून देण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे.

admission

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. यामुळे विद्यार्थी, पालक चिंतेत आले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अडसर दूर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्यासह विविध पर्याय उपलब्ध करून देण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे.

अकरावी प्रवेशाची पहिली फेरी राबविल्यानंतर प्रवेश थांबविण्यात आले. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. दहावी परीक्षेनंतर विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. एसईबीसी आरक्षणातील विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतल्यास त्यांना अकरावीच्या शुल्कामध्ये सवलत देण्याचा किंवा त्यांची फी माफ करण्याचा विचार शिक्षण विभागातील अधिकारी करत आहेत. त्याचबरोबर एसईबीसी गटातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गातून प्रवेशाची संधी देण्याबाबतचा पर्यायही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू करता येईल का याची चाचपणीही शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे लवकरच अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे शिक्षण संचालनालयातील अधिकार्‍यांनी सांगितले.