मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री उडवून देऊ; दुबईहून आला धमकीचा कॉल

शिवसेना पक्ष स्थापन करणारे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने याबाबतचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असलेले मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर येत आहे. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहोत, असे म्हटले आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, काल मातोश्रीवर दाऊद इब्राहिमच्या येथून बोलत असल्याचा फोन आला होता. साहेबांशी बोलायचे आहे, असे ते म्हणाले. मात्र धमकी वैगेरे काही दिली नाही. यासंबंधी पोलीस आयुक्तांना कळवले असून त्यांच्या तपासानंतरच सांगू शकतील की तो कॉल धमकीचा होता की नाही.

या घटनेवर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, अनिल परब यांनी शिवसैनिक अशा भ्याड धमक्यांना घाबरत नसून संकट आल्यास धिराने सामोरे जाऊ असे म्हटले आहेत. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी देखील मातोश्रीला आलेल्या धमकीसंदर्भात चिंता व्यक्त करत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मातोश्रीवर आलेल्या फोन कॉलबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

मातोश्रीवर आलेल्या फोन कॉलबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, September 6, 2020

दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास ३५० लोकांना आपला प्राण गमवावा लागला होता. तसेच १२०० हून अधिक लोक जखमी झाले होते. भारत सरकारने २००३ मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते.

हेही वाचा –

संजय राऊत म्हणतात, ‘कंगणाची माफी मागण्याचा विचार करेन, पण…’