Saturday, August 8, 2020
Mumbai
29 C
घर महामुंबई एकाच घरातील तीन पिढ्या बऱ्या होऊन गेल्या ‘ट्रॉमा’ रुग्णालयातून…

एकाच घरातील तीन पिढ्या बऱ्या होऊन गेल्या ‘ट्रॉमा’ रुग्णालयातून…

एकाच घरातीळ तीन पिढ्या आणि ३ महिन्याच्या बालका पासून ते १०० वर्षांच्या आजोबा पर्यंत सगळेच रुग्ण ठणठणीत बरे होऊ घरी परतले.

Mumbai
डॉ. विद्या माने

कोविडच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर अर्थात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सर्वसाधारण रूग्णालयात १९ मार्चपासून सुमारे ६ हजार बाह्य रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी १३०० रुग्ण बरे होऊन घरी परतले. एकाच घरातीळ तीन पिढ्या आणि ३ महिन्याच्या बालका पासून ते १०० वर्षांच्या आजोबा पर्यंत सगळेच रुग्ण ठणठणीत बरे होऊ घरी परतले. सर्वसाधारण रुग्णालय पूर्णपणे कोविडमध्ये रूपांतरित करताना यशस्वी उपाय योजना राखण्याचे काम रुग्णालयाच्या डॉ. विद्या माने यांनी केले. या साडेतीन ते चार महिने त्या घरी न जाता रुग्णालयातील इतर सहकाऱ्यांसह तिथे कुटुंबासारखे राहून कर्मचाऱ्यांपासून ते रुग्णापर्यंत कुणाचीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली होती.

कस्तुरबा रुग्णालयासह महापालिकेने बंद असलेले सेव्हन हिल्स रुग्णालय पूर्णपणे कोविड रूग्णांसाठी सर्वप्रथम सुरू केले. त्यानंतर महापालिकेने बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय कोविडसाठी खुले केले. या रुग्णालयात पहिला रुग्ण १९ मार्च रोजी दाखल झाले. तेव्हापासून ते आजतागायत या रुग्णालयाच्या अधीक्षक, त्यांचे सहकारी डॉक्टर, निम वैदयकीय कर्मचारी यांनी डोळ्यात तेल घालून सेवा देतानाच आपल्या सेवेत कुठेही कमतरता भासू दिली नाही. एक सर्वसाधारण रुग्णालय ते कोविड रुग्णालय असा प्रवास बनलेल्या या रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी आपली प्रामाणिक सेवा बजावत याठिकाणी दाखल झालेल्या रुग्णांपैकी तब्बल १३०० रुग्णांना बरे करून घरी पाठवले. ट्रॉमा रुग्णालयाची जबाबदारी पेलणाऱ्या डॉ. विद्या माने यांनी यापूर्वी सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या कोविड रुग्णाच्या व्यवस्थापनात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.

या विषयी बोलतांना डॉ. माने सांगतात, सेव्हन हिल्स रुग्णालयात अभियांत्रिकी कामे डॉ. महारुद्र यांनी पार पडल्यानंतर तेथील कोविड रुग्णांचे व्यवस्थापन आणि त्याचे नियोजन आदींची जबाबदारी पार पाडली.एकप्रकारे डिव्हिजन ऑफ वर्क होते. अर्थात रुग्णालया प्रमाणे जी व्यवस्था असायला हवी त्या सिस्टीमचा सेटअप करण्यासाठी माझा हातभार लागला होता. सेव्हन हिल्सचे काम सुरू होते तेव्हा, ट्रॉमा केअर रुग्णालयाचेही काम सुरू होते. त्यावेळी मी फोनवरून सूचना देऊन काम करून घेत असे. तिथून दहा दिवसांनी मी ‘ट्रॉमा’त आली.कारण तेव्हा ‘ट्रॉमा’ रुग्णालय पूर्ण पणे कोविडचे रुग्णालय होणार होते.

ट्रॉमा केअर रुग्णालय कोविड साठी सज्ज झाल्यानंतर१९ मार्च रोजी पहिला रुग्ण दाखल झाला. याबाबत माने सांगतात, १९ मार्चपासून आजपर्यंत बाह्य रुग्ण कक्षात ६ हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली.त्यात २७५० रुग्ण दाखल झाले होते. यातील १९०० रूग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यातील १३०० रुग्ण बरे झाले तर ४०० हुन अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले. आम्ही ३ महिन्याच्या बाळापासून ते १०० वर्षाच्या आजोबापर्यंत बरे करून घरी सोडले.एवढंच कशाला एकाच घरातील तीन पिढ्याही आमच्या रुग्णालयातून बऱ्या होऊन गेल्या. आणि तिघांनाही आम्ही एकाच दिवशी डिस्चार्ज दिला. यातील बाळ आणि आजी इथे ऍडमिट होते, तर बाळाची आई नायर रुग्णालयात ऍडमिट होते. ४- ५ दिवसांनी बाळाच्या आईलाही या रूग्णालयातून आणून पुढील उपचार केले. हे तिघेही बरे होऊन गेले.

अजून एक अनुभव सांगेन, एक ते दोन पेशंट असे होते की ज्यांची अशाच सोडली होती. हे दोन्ही रुग्ण नायर रुग्णालयातून माझ्याकडे व्हेंटिलेटरवर असताना आणले होते. या दोन्ही पेशंटला आम्ही चालत,बोलत घरी पाठवले. हे जसे चांगले आणि समाधान देणारे अनुभव आहेत, तसेच कटूही अनुभव आहेत. सुरुवातीच्या काळात तर नातेवाईक यायचेच नाही. आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधायचो, तेव्हा आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, असे सांगायचे. त्याचवेळी आम्हाला कळाले की माणूस मेल्यानंतर त्याचे काही उरत नाही ते. तर काही जण आम्ही गावी आहोत, आम्ही येऊ शकत नाही. आमची काही हरकत नाही. तुम्हाला जे करायचे ते करा. असे पण सांगणारी माणसे होती. त्यामुळे मग पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरुवातीला सेव्हन हिल्समधील कोविड रुग्णांच्या उपचार यंत्रणेच्या जबाबदारी पासून ते ट्रॉमा रुग्णालय आदींची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या माने या मार्च महिन्यापासून आपल्या घरा दारापासून दूर राहत १ जुलैला पहिल्यांदा मुलुंडच्या आपल्या घरी गेल्या. पती डॉक्टर, मुलगा नागपूरला डॉक्टर आहे. एक मुलगा अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. मुलगा आणि पती यांच्यापासून दूर राहत कोविड रुग्ण सेवा आणि शुश्रूषा करणाऱ्या माने सांगतात, सुरुवातीला सेव्हन हिल्सचे काम सुरू होते. तेव्हा सुरुवातीला एक-दोन वेळा आई जवळच राहायला असल्याने तिथे गेली होती, पण तिथेही राहायला जाणे रिस्की असल्याने मग तिथेही जायची. पुढे ट्रॉमा परतल्यानंतर तिथे राहायची व्यवस्था होतीच, मग तिथेच राहायची. अजूनही तिथेच आहे. १ जुलैला एकदा घरी जाऊन आली. जून महिन्यापर्यंत रूग्णांची जी काही परिस्थिती होती, ती आता राहिलेली नाही. आता थोडे रिलॅक्स झालो आहोत. आता कुठे थोडयाफार मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळतोय. इतर रुग्णालयातील डॉक्टरांप्रमाणे याही रुग्णालयातील डॉक्टरना कोविडची बाधा झाली होती.

त्या म्हणतात, इतर रूग्णालयाच्या तुलनेत आमचे डॉक्टर व इतर कर्मचारी कमी प्रमाणात बाधित झालेत. आमच्या रुग्णालयात ४०० डॉक्टर व इतर कर्मचारी आहे. आम्ही सुरुवातीपासून डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीचा अवलंब केला होता. ज्यामुळे हे प्रमाण कमी होते. एवढंच नव्हे तर आम्ही कोविड रुग्णांच्या खाटा कमी न करता येथील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खाटाची व्यवस्था केली होती.  कोरोनाचे काय आहे तो एकप्रकारे संसर्ग आहे. आणि आरोग्य सेवक म्हटल्यानंतर कुठलाही संसर्ग डॉक्टरांना होऊ शकतो नाही. नाही होऊ शकत असे नाही. त्यासाठी आपण आपली काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही आपल्याला संसर्ग होईल म्हणून जर पुढे गेलाच नाही तर तुमच्या डॉक्टर होण्याला काहीच अर्थ नाही. अशा आजाराला घाबरायचे तर डॉक्टर का व्हायचे मग? आमच्या या रुग्णालयात डायलिसिसची सुविधा कधीच नव्हती. पण कोविडच्या रुग्णांसाठी या ठिकाणी डायलिसिसची सुविधा सुरू करण्यात आली.

तब्बल ६०० रुग्णांची डायलिसिस करण्यात आली. या रुग्णालयात जे रुग्ण बरे होऊन गेले यातील महत्वाचे योगदान डॉक्टरांसह निवासी डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ, प्रशासकीय काम करणारे कर्मचारी वृंद, नर्सेस, इतर निम वैदयकीय कर्मचारी यांचे आहे. त्यांच्या टीम वर्क मुळेच हे शक्य झाले आहे. येथील आयसीयू विभागाच्या उभारणीतही रिलायन्स फाउंडेशन, टाटा प्रोजेक्ट यांचे बहुमूल्य सहकार्य आणि मदत प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here