घरमुंबईतीन पिढ्यांनी साकारला जगातील सर्वात उंच ...

तीन पिढ्यांनी साकारला जगातील सर्वात उंच पुतळा

Subscribe

जगप्रसिद्ध मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांच्या तीन पिढ्यांनी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमधील नर्मदा धरण येथे साकारला आहे. बुधवारी पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 93 वर्षीय शिल्पकार राम सुतारांचा सत्कार झाला आणि पंतप्रधानांनी त्यांचा आपल्या भाषणात खास उल्लेख केला तेव्हा राम सुतार यांच्याबरोबर त्यांचा मुलगा 61 वर्षीय अनिल सुतार तसेच नातू 30 वर्षांचा समीर या सार्‍यांची छाती अभिमानाने भरून आली होती. राम सुतारांची ही कामगिरी मराठी माणसांची मान उंचावणारी ठरली आहे. राम सुतार यांनी 33 महिन्यांच्या रेकॉर्ड ब्रेक वेळेत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीच्या सहकार्याने हा भव्य पुतळा उभारला आहे.

1700 टन ब्राँझ, स्टील मोल्ड, लोखंड आणि काँक्रीट अशा सामुग्रीने सरदारांचा 182 मीटर म्हणजे 597 फूट उंचीचा पुतळा घडवताना सुतार कुटुंबाला आपली सर्व कला पणाला लावावी लागली. गेल्या 4 वर्षांत हे आव्हान लीलया पार करत आणि चीनमध्ये मुक्काम ठोकून त्यांनी हे लक्ष्य साध्य केले. पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड देऊन राम सुतार यांनी आपल्या शिल्पकलेला जगभर नेले आणि त्यानंतर अनिल सुतार यांनी शिल्पकलेचे पदवी शिक्षण घेऊन वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली. आता अनिल यांचा मुलगा समीरही कलेचे शिक्षण घेऊन आपल्या आजोबा आणि वडिलांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. 1959 पासून दिल्लीत राहून आपली कला सार्‍या जगभर नेणारे धुळ्याचे राम सुतार यांची तिसरी पिढी शिल्पकलेची परंपरा पुढे नेत आहे.

- Advertisement -

राम यांच्या बोलण्यातून तो उत्साह सरदार सरोवर येथून बोलताना जाणवत होता. गेली 4 वर्षे एक एक पार्ट तयार करत आणि हे पार्ट एकावर एक रचत आपण हा पुतळा तयार केला. पाया झाल्यानंतर पाय, त्याच्या वरचा भाग, पोट, छाती आणि मग चेहरा असे करत पुतळा पूर्ण करण्यात आला. पार्ट तयार झाल्यानंतर जागेवर ते जोडण्याचे काम इंजिनियर करत. ब्राँझ, लोखंड आणि स्टीलच्या कास्टिंगसाठी आपल्याला गेल्या चार वर्षांत अनेकवेळा चीनला जावे लागले. तेथेच त्याचे साचे तयार करून मग भारतात आणून ते जोडले गेले.

जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्याचे तुमच्या समोर मोठे आव्हान होते का, असे विचारले असता राम सुतार लगेच उत्तरले, कसले आव्हान? चॅलेंज वगैरे काही नव्हते. असे प्रचंड उंचीचे पुतळे तयार करण्याचे एक तंत्र असते. आधी मोजमाप घेऊन त्याचा प्राथमिक आकार तयार केला जातो आणि मग त्याला इनलार्ज करून पुतळा आकाराला येतो. हा पुतळा आकाराने मोठा आणि स्टील, लोखंड, काँक्रिट आणि ब्राँझचा असला तरी तो आतून पोकळ आहे.

- Advertisement -

70 फुटांचा चेहराच सांगतो कहाणी
सरदार पटेल यांच्या ५९७ फुटांच्या पुतळ्यापैकी 70 फुटांचा फक्त चेहरा आहे आणि सर्वात कठीण काम या चेहर्‍याचे होते. सलग तीन महिने या चेहर्‍यावर आम्ही काम करत होतो. चेहरा तयार होत असताना 500 फूट दूर जाऊन त्याचे निरीक्षण करत होतो. प्रत्येक दिवशी 500 फुटांवरून किमान 15 चकरा मारून चेहरा वेगवेगळ्या कोनातून पाहून मग काम फायनल केले जायचे. भारताच्या पोलादी पुरुषाचे सर्व भाव या चेहर्‍यात आले पाहिजेत, असा आमचा सुतार कुटुंबाचा अट्टहास होता. एक कलाकार म्हणून समाधान मिळाले तरच त्याचा आनंद आम्ही लोकांना देणार होतो आणि आज तो पुतळा 500 फुटांवरून बघताना सरदार पटेल नर्मदेच्या काठावर जिवंत उभे असल्याचे लोकांना दिसते, तेव्हा आमची कला सार्थकी लागल्याचे समाधान मिळते, असे राम सुतार सांगतात.

350 शहरात पुतळे उभारले
राम सुतार यांनी 1959 पासून आजतागायत जगभरात 350 शहरांत पुतळे उभारले आहेत. दिल्ली, रशिया, युरोप, अमेरिका असा सर्वदूर त्यांचा संचार आहे. दिल्लीत संसद भवन परिसरात 16 नेत्यांचे पुतळे आहेत. एकट्या लखनौमध्ये 500 पुतळे असून त्यात आंबेडकर, महात्मा फुले, कांशीराम, मायावती यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. यात लखनौच्या बगिच्यामधील 350 झाडे, पशू,पक्षी यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकरही साकारणार
मुंबईतून सर्व जगाचे लक्ष वेधून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळेही राम सुतार साकारणार आहेत. इंदू मिलमधील 250 फूट उंचीच्या आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरू झालेले नाही. पण, समुद्रात हा पुतळा उभारणे आमच्या सर्वांसाठी आव्हान असेल, असे अनिल सुतार सांगतात.

92 वर्षांचा तत्पर कलाकार- मोदी
92 वर्षांच्या राम सुतार यांचे या वयातही उंचच उंच पुतळे घडवण्याचे कौशल्य आणि तत्परता खूप मोठी आहे. अशा वयात माणसे शांतचित्त होऊन जातात. पण, हा कलाकार सतत नवनव्याचा ध्यास घेऊन काम करतो, हे मला स्वतःला स्फुर्तीदायक वाटते, असे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमावेळी केले.

सर्वात उंच पुतळ्याची वैशिष्ट्ये

गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील गरुडेश्वर धरणाजवळ साधू बेटावर 182 मीटरचा (597 फूट) पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा पाया 240 मीटर म्हणजे 790 फूट उंच आहे.

चीनमधील वसंत मंदिराच्या बुद्ध मूर्तीपेक्षा (153 मीटर ) तो उंच आहे आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उंचीच्या तो दुप्पट आहे. चीनमधील बुद्ध मूर्ती उभारायला 11 वर्षे लागली. मात्र हा पुतळा 33 महिन्यांत उभारला गेला.

हा पुतळा उभारण्यासाठी एकूण 2989 कोटी रुपये खर्च झाला. लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो कंपनीने हे काम केले असून भारतीय अभियांत्रिकी कौशल्य आणि प्रकल्प व्यवस्थापन याचा उत्तम समन्वय म्हणजे हा पुतळा आहे.

स्मारकात पोहचण्यासाठी लिफ्टची व्यवस्था आहे. पुतळ्याची तीन स्तरावर विभागणी करण्यात आली आहे. यात प्रदर्शनासाठी मजला, बाल्कनी, टेरेस याचा समावेश आहे. टेरेसमध्ये स्मारक पार्क, एक भव्य संग्रहालय आणि प्रदर्शन हॉल आहे. यात सरदार पटेल यांचे जीवन आणि त्यांचे योगदान याविषयी माहिती आणि छायाचित्रे लावण्यात आली आहेत. नदीपासून 500 फूट डेकदेखील बांधण्यात आला आहे. येथून 200 जण एकाच वेळी पुतळा बघू शकतात. पुतळ्याजवळ जाण्यासाठी बोटीची व्यवस्था केली आहे.

जगातील सर्वांत उंच पुतळा आपल्या हातून साकारला गेला, याचा अभिमान वाटतो. गेली 4 वर्षे कमीत कमी 33 महिन्यांत ते एक लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून पुतळा तयार केला. तो करताना कुठल्याच तडजोडी केल्या नाहीत. याचा एक कलाकार म्हणून मिळणारा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही.
– राम सुतार, जगप्रसिद्ध शिल्पकार

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -