घरमुंबईकर्जाच्या आमिषाने फसविणार्‍या त्रिकूट गजाआड

कर्जाच्या आमिषाने फसविणार्‍या त्रिकूट गजाआड

Subscribe

मुंबई:-कर्जाच्या आमिषाने फसविणार्‍या एका त्रिकुटाला सोमवारी धारावी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. तेजबहादूर साहेबसिंग, जावेद जलाल शेख आणि मोहम्मद इस्माईल ऊर्फ सुरज ऊर्फ सुफियान मोईनउद्दीन अशी या तिघांची नावे आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यात ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार हे धारावी परिसरात राहतात. सप्टेंबर महिन्यांत त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन कर्जाची आवश्यकता आहे का याबाबत विचारणा केली होती. कर्जाची गरज असल्याने त्यांनीही होकार दिला होता. यावेळी या व्यक्तीने त्यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांना सहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांच्याकडून त्यांचे सर्व दस्तावेज आणि दोन धनादेश घेतले होते.

कर्जाच्या प्रोसेसिंग फी म्हणून त्यांच्याकडून सव्वालाख रुपयेही घेतले होते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या नऊ मोबाईल क्रमांकावर तीनजण कर्जाविषयी माहिती देत होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी कर्जाची रक्कम मिळवून दिली नाही, त्यामुळे त्यांनी प्रोसेसिंग फी म्हणून दिलेल्या रक्कमेची त्यांच्याकडे मागणी सुरु केली होती. मात्र ते तिघेही ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते.

- Advertisement -

सोमवारी तक्रारदारांनी अन्य एका व्यक्तीला कर्जाची गरज असल्याचे सांगून धारावी परिसरात बोलाविले होते. सोमवारी तिथे मोहम्मद इस्माईल आला होता. यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्यांनी धारावी पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या चौकशीत त्याच्या इतर दोघांची नावे पोलिसांना समजली. त्यानंतर जावेद शेख आणि तेजबहादूर सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही टोळी कर्जाचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करीत होती. आपण एका वित्तपुरवठा करणार्‍या कंपनीचे कर्मचारी असल्याचे त्यांनी सांगितले होते. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -