खारमध्ये ६१ लाखांचा एमडी ड्रग्स जप्त; तिघांना अटक

खार येथे ६१ लाखांचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला असून याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले आहे.

Mumbai
four held for selling ‘illegal’ drugs in Bhiwandi
नशेच्या औषधाची विक्री

लोकसभा निवडणुकीत कुठेही अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क असतानाच खार येथे एमडी ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या तिघांना खार पोलिसांच्या एका विशेष पथकाने शिताफीने अटक केली आहे. संजय कृष्णा पांडे, सचिन रमेश मुदलीयार आणि रोशनकुमार विजयकुमार पांडे अशी या तिघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी १ किलो ५२६ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची किंमत सुमारे ६१ लाख रुपये आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले.

असा लावण्यात आला सापळा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क आहेत. सर्वत्र पोलीस बंदोबस्त असताना खार येथे काही तरुण एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी खार येथील नॅशनल कॉलेज बसस्टॉपजवळील उत्तर वाहिनीवर साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी सायंकाळी तिथे तीन तरुण संशयास्पदरीत्या फिरत होते. या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतल्यानंतर पोलिसांना त्यांच्याकडून १ किलो ५२६ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत ६१ लाख ४ हजार रुपये आहे. एमडी ड्रग्ज बाळगणे आणि त्याची विक्री केल्याप्रकरणी नंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात संजय पांडे याला सात वर्षांपूर्वी दिल्ली येथे अशाच एका गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा ड्रग्ज तस्करी करण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही महिन्यांत या टोळीने अनेकांना एमडी ड्रग्जची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.