घरमुंबईसोनसाखळी चोरीसह तीन व्यापार्‍यांना अटक

सोनसाखळी चोरीसह तीन व्यापार्‍यांना अटक

Subscribe

गर्दीचा फायदा घेऊन पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलच्या प्रवाशांचे सोनसाखळी चोरी करुन पळून जाणार्‍या एका रेकॉर्डवरील आरोपीस चोरीचे दागिने खरेदी करणार्‍या तीन व्यापार्‍यांसहअंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. राजू मधुकर पाटील असे या आरोपीचे नाव असून इतर तीन व्यापार्‍यांमध्ये पहाडसिंग जयसिंगजी राजपुरोहित, कल्पेश देवीसिंग दासाना आणि जितेंद्र मोपसिंग राजपुरोहित यांचा समावेश आहे. या चौघांकडून पोलिसांनी आठ गुन्ह्यांतील 97 ग्रॅम वजनाच्या आठ लगडी जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी यांनी सांगितले. चारही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु आहे.

राजू पाटील हा रेल्वे हद्दीत सोनसाखळी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याने अलिकडेच अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ प्रवाशांच्या सोनसाखळी चोरल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजूचा सहभाग उघडकीस येताच त्याच्या अटकेसाठी अंधेरी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. याच दरम्यान राजू हा अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील बस डेपोजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी यांच्या पथकातील अर्चना क्षीरसागर, पाटील, देवकर, देखणे, शेख यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून राजूला अटक केली.

- Advertisement -

राजू हा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध बोरिवली, अंधेरी, वांद्रे, मुंबई सेंट्रल रेल्वे ठाण्यात 35 हून अधिक सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने अलीकडेच्या काळात अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ गुन्हे केले होते. त्याचे वडील मधुकर पाटील हेदेखील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अनेकदा ते राजूसोबत सोनसाखळी चोरी करत होते. वडिलासोबत राहून तोदेखील सोनसाखळी चोरी करु लागला होता. गेल्या काही वर्षांत त्याने पश्चिम रेल्वेच्या अनेक प्रवाशांच्या सोनसाखळी चोरी करुन त्याची विक्री केली होती. यातील बहुतांश गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती, मात्र जामिनावर बाहेर येताच तो पुन्हा सोनसाखळी चोरी करत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -