घरताज्या घडामोडी26/11च्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

26/11च्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

Subscribe

दहशतवादी हल्ला झालाच तर त्याचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला गुरुवारी बारा वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान 26/11सारखा दहशतवादी मुंबई शहरात होऊ नये म्हणून पोलीस सतर्क आहे. मात्र आगामी काळात असा दहशतवादी हल्ला झालाच तर त्याचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरात दहशवादी हल्ला झाला होता. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबई शहरात प्रवेश करुन भीषण दहशतवादी हल्ला केला होता. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई छाब्रा हाऊस, ओबेरॉय हॉटेल, ताज पॅलेस अ‍ॅण्ड टॉवर, लिपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा, आणि सेंट झेव्हिअर कॉलेज गल्ली या आठ ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 174 जणांचा प्राण गेले तर तिनशेहून अधिक लोक जखमी झाले होते. यावेळी नऊ दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले तर मोहम्मद अजमल कसाब या एकमेव दहशवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले होते. त्याच्या अटकेने या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते.

- Advertisement -

या हल्ल्यात सहपोलीस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामठे, मेजर उन्नीकृष्णनन, पोलीस निरीक्षक विजय साळसकर, शंशाक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, बापूसाहेब दुरुगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे, बाळासाहेब भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल एम. सी चौधरी, एनएसजी कंमाडो गजेंद्र सिंग, पोलीस हवालदार जयवंत पाटील, विजय खांडेकर, अरुण चित्ते, योगेश पाटील, अंबादास पवार, एसआरपीएफचे जवान राहुल शिंदे, होमगार्ड हवालदार मुकेश जाधव या अठरा पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि जवानांना वीरमरण आले.

या घटनेला गुरुवारी बारा वर्ष पूर्ण होत असल्याने मुंबई शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. खबरदारी म्हणून मुंबई शहरात येणार्‍या सर्व चेकनाक्यावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यासाठी लोकल बंद आहे. मात्र काही प्रमुख रेल्वे स्थानकातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मंत्रालय, विधानसभा, शासकीय-निमशासकीय कार्यालयाच्या इमारती, धार्मिक स्थळे, विमानळ, तसेच महत्त्वाच्या ठिकाणावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

- Advertisement -

गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात शहिद पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि जवानांसाठी अभिवादन संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, गृहमंत्र्यासह राज्य पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहे. बारा वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण अजूनही मुंबईकराच्या मनात आहे. या हल्ल्यात मुंबई पोलीस दलासह होमगार्ड, एनएसजी आणि होमगार्डच्या अठराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. मुंबई पोलीस दलात कमांडोची एक फौज तयार करण्यात आली होती. यापुढे शहरात 26/11 सारखा दहशतवादी होऊ नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क आहे, मात्र असा प्रयत्न कोणीही करण्याचा प्रयत्न केला तर तो हल्ला परतावून लावून देण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने बोलताना सांगितले.


हेही वाचा – गुगल पे मार्फत भारतीयांसाठी महत्वाची घोषणा, युजर्सना मोठा दिलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -