महापालिकेचे ट्विटर हाताळण्यासाठी ३२ समन्वय अधिकारी

महापालिकेचा भर आता सोशल मिडियावरील प्रसिध्दीवर

Mumbai
bmc building
मुंबई महानगरपालिका मुख्यालय

मुंबई महापालिकेचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर प्रविणसिंह परदेशी यांनी समाजमाध्यमाला (सोशल मिडिया) विशेष महत्व देण्यास सुरुवात केले असून लोकांना थेट तक्रारी मांडता याव्यात आणि महापालिकेच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी ट्टिटरच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. एमसीजीएम डिझास्टरच्या नावाने असलेल्या ‘ट्विटर’ला अपडेट करत महापालिकेने याचे नामकरण ‘माझी मुंबई आपली बीएमसी’ असे केले आहे. त्यामुळे ट्विटरचे अकाउुंटस हाताळण्यासाठी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये तसेच खात्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे ३२ समन्वयक अधिकारी (नोडल ऑफिसर)नियुक्ती करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने नागरी समस्या मांडण्यासाठी ट्विटरचे अकाउुंटसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजवर ट्ॅफिक पोलिस, रेल्वे प्रशासन, पोलिस आदींनी ट्विटरचे अकाउुंटसची सुविधा देत नागरिकांना सूचना तसेच समस्या मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. त्याप्रमाणे महापालिकेनेही काळाप्रमाणे आपल्याल बदल करत अशाप्रकारची सुविधा नागरिकांना सोशल मिडियाद्वारे खुली करून दिली आहे. यापूर्वी महापालिकेच्या मुख्य आपत्कालनि नियंत्रण कक्षाच्यावतीने चालवण्यात येणार्‍या ट्विटरचे अकाउुंट्सचे नामकरण करत नव्याने नागरिकांना तक्रारी मांडण्यासाठी ‘ट्विटर’ची सुविधा दिली आहे. यापूर्वी या ट्विटरचे ४० हजार फॉलोअर्स होते. परंतु आठ दिवसांपूर्वी या खात्याने नुतनीकरण झाल्यानंतर याचे ४ हजारांनी फॉलोअर्स वाढले आहेत. सध्या या ‘ट्विटर’चे ४४ हजार फॅालोअर्स आहेत.

महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रविणसिंह परदेशी यांनी सोशल मिडियावरील प्रसिध्दीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ‘माझी मुंबई आपली बीएमसी’ या ‘ट्विटर’द्वारे महापालिकेचे काम जनतेपर्यंत पोहोचवून प्रशासनाची प्रतिमा उंचावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यासाठी आयुक्तांनी २४ विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे तसेच खात्यांमध्ये समन्वयक अधिकारी यांची ट्विटरचे अकाउुंट्स हाताळण्यासाठी नेमणूक करण्याचे आदेश दिले आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत ७० हून अधिक समन्वय अधिकारी सहभागी झाले होते. त्यानुसार २४ विभाग कार्यालये तसेच खात्यांमध्ये मिळून एकूण ३२ समन्वयक अधिकारी यांची नेमणूक करण्यात येत असून यांच्या माध्यमातून ‘ट्विटर’आलेल्या तक्रारींचे निवारण करणे तसेच महापालिकेने केलेली विकास कामे ही ‘ट्विटर’वर टाकून सोशल मिडियाद्वारे प्रसिध्दी मिळवून घेण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने केला जात आहे.

या ट्विटर अकाउुंटसची मुख्य जबाबदारी महापालिकेच्या जनसंपर्क विभागावर सोपवली जाणार असून या खात्याद्वारे दैनंदिन प्रसिध्द होणार्‍य बातम्यांचेही निराकरण केले जाणार आहे. त्यामुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून जनसंपर्क विभागाची वाटचाल डिजिटल मिडियाच्या दिशेने सुरु करण्याचाही निर्धार आयुक्तांनी केल्याचे बोलले जात आहे.