या औषधाची काळ्या बाजारात होतेय एक लाखाला विक्री

काळ्या बाजारामध्ये टोसीलीझूमॅब इंजेक्शनची विक्री तब्बल एक लाख रुपयांना होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी केलेल्या कारवाईमध्ये उघड झाले. दिल्लीहून आलेल्या व्यक्तीकडून तब्बल १५ इंजेक्शन जप्त करण्यात आले.

कोरोनासाठी महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या टोसीसीझूमॅब व रेमडिसीवीर या इंजेक्शनची मागणी व उपलब्धता यामध्ये तफावत असल्याने मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. काळ्या बाजारामध्ये टोसीलीझूमॅब इंजेक्शनची विक्री तब्बल एक लाख रुपयांना होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी केलेल्या कारवाईमध्ये उघड झाले. एफडीने आणि वांद्रे पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईमध्ये दिल्लीहून आलेल्या व्यक्तीकडून तब्बल १५ इंजेक्शन जप्त करण्यात आले.

तब्बल १५ इंजेक्शन जप्त

दिल्लीहून एक व्यक्ती टोसीलीझूमॅब इंजेक्शन घेऊन विक्रीसाठी वांद्रे येथे येत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानंतर एफडीएच्या निरीक्षकांनी वांद्रे पोलिसांसह वांद्रे रेक्लमेशन येथे सापळा रचला. त्यानुसार ३ ऑगस्टला आझम नसीर खान याला वांद्रे रेक्लमेशन येथे सिप्ला कंपनीचे ४० हजार ५४५ रुपये किंमतीचे टोसीलीझुमँब (अक्टरमा ४०० इंजेक्शन) विना प्रिस्क्रिप्शन , विना परवाना विक्री करताना रंगेहाथ पकडले. आझम खान तब्बल एक लाख रुपयांना या इंजेक्शनची विक्री करत होता. आझम खानची चौकशी केली असता त्याच्याकडे १५ इंजेक्शन सापडली असून, ही सर्व इंजेक्शन त्याने दिल्लीतून कोणत्याही बिलाशिवाय खरेदी केली असल्याचे त्याने सांगितले.

वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

औषधांचा काळाबाजार व अवाजवी किमतीत विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या राज्य सरकारच्या सूचनांच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त अरुण उन्हाळे, दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज, सह आयुक्त डी. आर. गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या मुंबई विभागाचे औषध निरीक्षक व वांद्रे पोलिसांनी एकत्रितपणे कारवाई केली. या कारवाईत औषध निरीक्षक संजय राठोड, शरदचंद्र नांदेकर आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेश देसाई, पोलिस निरिक्षक आशा कोरके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर जाधव व पोलीस कर्मचार्‍यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या प्रकरणी औषध निरीक्षक संजय राठोड यांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

औषध विक्रीची माहिती देण्याचे आवाहन

रुग्णास छापील दरापेक्षा जास्त दराने औषधे विक्री होत असल्यास व औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ किंवा ०२२२६५९२३६२ या वर संपर्क साधावा असे आवाहन दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी केले.