घरमुंबईसहलींचे आयोजन पुन्हा रिसॉर्टवरच

सहलींचे आयोजन पुन्हा रिसॉर्टवरच

Subscribe

पालकांकडून घेतले जातय ना हरकत पत्र

राज्यभरातील शाळांच्या शैक्षणिक सहली या रिसॉर्ट, समुद्रकिनारी नेऊ नयेत, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने गेल्यावर्षी दिले आहेत. मात्र, या अध्यादेशाला पुन्हा एकदा केराची टोपली दाखवित मुंबईतील अनेक शाळांनी रिसॉर्टवरच सहलींचे आयोजित केली आहे. रिसॉर्ट चालकांकडून शाळांना देण्यात येणार्‍या कमिशनमुळेच या सहलींचे आयोजन करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती इतर शिक्षकांकडून देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, सहलींचे आयोजन करताना जबाबदारीतून हात झटकत शाळांनी पालकांकडून ना हरकत पत्र लिहून घेतले असून पालक त्यांच्या जबाबदारीवर सहलीला पाठवित असल्याचे या प्रमाणपत्रात लिहून घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर रिसॉर्टवर आयोजन करताना येणारा खर्च कमी असल्याने या सहलींचे आयोजन केले जात असल्याची माहितीही अनेकांकडून देण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करताना होणारे अपघात लक्षात घेता शिक्षण विभागाने गेल्यावर्षीपासून शैक्षणिक सहलींसाठी नियमावली जाहीर केली होती. या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या सहलींचे आयोजन करताना त्या ऐतिहासिक ठिकाणी किंवा शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या अशा ठिकाणी नेण्याचे अधोरेखित करण्यात आले होते. तर या निर्णयानुसार विद्यार्थ्यांची सहल समुद्रकिनारी, रिसॉर्ट, तळे अशा ठिकाणी नेऊ नये, अशी ताकीद देखील देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही यंदा मुंबईतील अनेक शाळांनी रिसॉर्टवर सहलींचे आयोजन केल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक शाळांनी रिसॉर्टला पर्याय म्हणून नेचर आणि अ‍ॅडेव्हेंचर्स पार्कात या सहली आयोजित करीत आयाडियाची कल्पना लढविली आहे. या सहलींचे आयोजन करताना शाळांनी जबाबदारीतून सुटका करण्यासाठी पालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. या पत्रात पालक त्यांच्या जबाबदारीवर सहलीला पाठवित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सहल हा आता पुन्हा एकदा वादाच्या मुद्दा ठरली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने शिक्षकांशी चर्चा केली असता अनेक कारणे समोर आली आहेत. ज्यात प्रामुख्याने अनेक शिक्षकांनी रिसॉर्टवर सहलींचे आयोजन करण्यास शाळा प्रशासन आणि रिसॉर्ट मालकांचे असलेले साटेलोटे जबाबदार असल्याची टीका केली आहे. तर विद्यार्थ्यांची सहल रिसॉर्टवर केल्यास शिक्षकांची दमछाक होत नाही, रिसॉर्ट व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या जेवणापासून इतर सोयींसाठी कामगार नेमण्यात आलेले असल्याने शाळांकडून रिसॉर्टला पसंती दर्शवित असल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक शाळांमध्ये रिसॉर्टवर सहल आयोजित केल्यानंतरच विद्यार्थी सहलींना मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या सहलींना अधिक प्राधान्य दिले जात असल्याची माहिती या शिक्षकांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -