घरमुंबईमुंबईकरांची कंटाळवाण्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार

मुंबईकरांची कंटाळवाण्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार

Subscribe

८९१ कोटींची आधुनिक प्रणाली येणार

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकार नवी वाहतूक प्रणाली आणणार आहे. मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मुंबईत येत्या काळात आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस- इंटिलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी 891 कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वाहनांची संख्या खूप वाढत चालली आहे. सध्या मुंबईत सुमारे 34 लाख वाहने असून प्रतिहजार व्यक्तींमागे साधारणत: 261 व्यक्तींकडे स्वत:चे वाहन आहे. मुंबई महानगरातील वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा यातून प्रवासासाठी लागणारा वेळ व इंधनावर होणारा खर्च, प्रवासासाठी लागणार्‍या वेळेतून कार्यक्षमतेवर होणारा परिणाम या सर्वांवर उपाय म्हणून अद्ययावत वाहतूक व्यवस्थापनाची गरज आहे. मुंबई महानगरात सुमारे 2 हजार किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. यातील सुमारे 95 टक्के रस्त्यांची देखभाल ही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने मुख्यत्वे उड्डाणपूल बांधण्यात येतात. या सर्व रस्ते, उड्डाणपूल यांच्यावरील एकत्रित वाहतूक नियंत्रण आणि नियोजनासाठी इंटिलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

- Advertisement -

या प्रकल्पासाठी 891 कोटी 34 लाखांचा खर्च होणार आहे. या प्रकल्पामध्ये विकसित होणारी यंत्रणा ही अत्याधुनिक असेल. रस्त्यांच्या लांबीनुसार वाहनांची संख्या निश्चित करुन तसेच रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण विचारात घेऊन प्रत्यक्षपणे सिग्नल यंत्रणेच्या वेळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करणे शक्य होणार आहे. तसेच गरजेप्रमाणे सिग्नल यंत्रणेची वेळ प्राधान्यक्रमानुसार बदलता येणार आहे. स्मार्ट सिग्नलिंग, लायसन्स नंबर प्लेट ओळख, अतिवेगवान अथवा चुकीच्या दिशेने येणारी वाहने आणि अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण, चोरीची वाहने शोधण्यास मदत, दंड वसुलीत वाढ हे फायदे या प्रकल्पातून साध्य होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -